लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
कोल्हापूर:-संचारबंदीमुळे चित्रीकरणाला परवानगी नसल्याने राज्यातील जवळजवळ १७ हिंदी व
मराठी मालिका आणि काही बिग बजेट चित्रपटांचे चित्रीकरण पॅकअप झाले आहे. त्यांचे
यापुढे गोवा, उत्तर
प्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेशासह इतर
राज्यात चित्रीकरण होणार आहे. यामुळे शंभर ते दोनशे कोटीची उलाढाल थांबणार आहे. ही
परिस्थिती कायम राहिल्यास हा आकडा काही हजार कोटीपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली
जात आहे. यातून राज्याचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडणार आहे. शिवाय पडद्यामागील
कलाकार व तंत्रज्ञ यांचे काम बंद होणार असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट
कोसळणार आहे.
राज्यात करोनाचा कहर झाला आहे. त्याला रोखण्यासाठी संचारबंदी
जाहीर केली आहे. अनेक गोष्टीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहे. सिनेमा व नाट्यगृहे
बंद ठेवण्याचे आदेश असून चित्रीकरणालाही बंदी घातली आहे. याचा मोठा फटका सिने
व्यवसायाला बसत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून दहा मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे.
त्यामध्ये दख्खनचा राजा जोतिबा, रात्रीच खेळ चाले, मुलगी झाली हो, देवमाणूस, आई काळुबाई,
राजा राणीची ग जोडी अशा काही मालिकांचा समावेश आहे. मेहंदी है
रचनेवाली या हिंदी मालिकेचेही चित्रीकरण कोल्हापुरात सुरू होते. याशिवाय मुंबई,
पुणे, नाशिक व इतर शहरात बालाजी टेलिफिल्म,
झी, स्टार, कलर्स अशा
अनेक प्रॉडक्शनचे चित्रीकरण सुरू होते. पण अचानक संचारबंदी लागू झाल्याने अनेक
मालिकांचे चित्रीकरण थांबले आहे.
गेल्यावर्षी सहा ते आठ महिने चित्रीकरण
बंद होते. त्यानंतर पुन्हा प्रेक्षकांना आपल्याकडे वळविण्यात अनेक मालिकेच्या
निर्मात्यांना बराच त्रास झाला. आता कुठे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असताना तो
पुन्हा दुसरीकडे वळू नये यासाठी निर्मात्यांनी इतर राज्यात चित्रीकरण करण्याचा
निर्णय घेतला आहे. आयपीलएल च्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मालिकांचे नवीन भाग
दाखवणे आवश्यक आहे. यामुळे अनेकांनी राज्यातील चित्रीकरण पॅकअप करत इतर राज्यात
चित्रीकरण करण्यास सुरुवातही केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील १७ ते
१८ मालिकांचे चित्रीकरण आता दुसऱ्या राज्यात होणार आहे. काहीनी आठवड्यात आपला सर्व
सेट तिकडे हलवला आहे. एका हिंदी मालिकेची महिन्याला किमान तीन कोटींची उलाढाल
असते. मराठीची सुद्धा ५० ते ६० लाखाची उलाढाल होते. बिग बजेट चित्रपटांची उलाढाल
कित्येक कोटींची असते. आता चित्रीकरण थांबल्याने उलाढालच बंद होणार आहे. याचा मोठा
फटका पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञ
यांना बसणार आहे.
कोल्हापुरात सुभाष घई यांच्या हिंदी
चित्रपटाचे चाळीस दिवस चित्रीकरण होणार होते. टकाटक चित्रपटाबरोबरच नेटफ्लिक्सवरील
सहा मालिकांचे चित्रीकरण नियोजित होते. आता हे सर्व रद्द झाले असून यातील अनेकांनी
गोवा, हैद्राबाद, भोपाळ, जयपूर गाठले आहे. यामुळे शंभर ते दोनशे
कोटीपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल थांबली आहे. याचा मोठा फटका राज्याच्या
महसूलबरोबरच पडद्यामागील कलावंतांना बसणार आहे.
0 टिप्पण्या