लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
)
मुंबई:- करोना संसर्गाचे संकट तीव्र होत असल्याने शालेय शिक्षण
विभाग तसेच, आता सीबीएसईनेही
बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा पुढे गेल्यामुळे बारावी
परीक्षेनंतर एमएचटी सीईटी घ्यावी लागणार आहे. यामुळे राज्यातील अभियांत्रिकी,
फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक
अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र सलग दुसऱ्या वर्षी कोलमडणार आहे. यामुळे
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री आणि
शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी
मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यात बारावीनंतर एमएचटी सीईटी देणारे
विद्यार्थीही लाखांच्या घरात आहेत. यंदा बारावीच्या परीक्षाच न झाल्याने या सीईटी
संदर्भात अद्याप वेळापत्रकच जाहीर केलेले नाही. बारावी परीक्षा वेळेत होणार
नसल्याने आता या विद्यार्थ्यांच्या सीईटीदेखील वेळेत होणार नाहीत, असेच चित्र आहे. राज्यातील अभियांत्रिकी,
फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी
बारावीनंतर एमएचटी सीईटी परीक्षा द्यावी लागते. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सीईटी
परीक्षा झाल्या होत्या. त्यामुळे डिसेंबरनंतर प्रत्यक्षात यंदाचे शैक्षणिक वर्ष
सुरू झाले. यंदा बारावीची परीक्षा अद्याप झालेली नाही. यामुळे आगामी शैक्षणिक
सत्रच कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
बारावी परीक्षेनंतर निकाल जाहीर
होण्यासाठी महिनाभराचा अवधी असला तरी या कालावधीत सीईटी ऑनलाइन पूर्ण केली जाते.
दरवर्षी या परीक्षेसाठी पाच लाख विद्यार्थी नोंदणी करतात. सीईटी ऑनलाइनसाठी
स्वतंत्र संगणक सुविधा दिली जाते. त्यानुसार परीक्षा घेतली जाते. गतवर्षी
कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळून आणि अन्य सुविधा देऊन परीक्षा घेतली होती.
विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सत्रात आणि सर्व नियम पाळून परीक्षा घ्यावी लागली
होती. या वर्षी बारावीची परीक्षाच न झाल्याने सीईटी सेलकडून परीक्षेसंदर्भात
कोणत्याही प्रकराच्या अधिसूचना दिलेल्या नाहीत. केवळ अभ्यासक्रमाबाबत सूचना
दिलेल्या आहेत. त्यातच आता सीबीएसईच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सीबीएसई बारावी परीक्षेबाबत १ जून रोजी
बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहे. यानंतर या परीक्षांचे भवितव्य ठरणार आहे.
त्यातच राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने १ ऑगस्ट रोजी नीट परीक्षेचे आयोजन होणार
असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे वैद्यकीय प्रवेश यंदा सप्टेंबरमध्येच सुरू होतील
असे चित्र आहे. परिणामी यावर्षीही जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू न होता ते डिसेंबर
अथवा पुढील जानेवारीमध्ये होण्याची चिन्हे आहेत.
यंदाही नुकसान होऊ नये...
ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण
मंत्रालयाने सर्व राज्यांच्या शालेय शिक्षणमंत्र्यांशी तसेच, शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून एक
योजनाबद्ध नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचे यंदा झालेले नुकसान पुढील वर्षी होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र
येऊन प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मतही काही प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या