लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: जगाभोवती करोनाचा विळखा पुन्हा
एकदा घट्ट होत असताना इस्रायलनं करोनामुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. इस्रायलच्या
या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही संधी साधत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र
सरकारला लक्ष्य केलं आहे. 'इस्रायलला जे जमले ते मोदींना
आपल्या देशात का जमवता आले नाही?,' असा सवाल शिवसेनेनं केला
आहे.
संपूर्ण लसीकरणाद्वारे इस्रायलनं
करोनामुक्तीचं ध्येय गाठलं आहे. करोनामुक्तीची घोषणा केल्यानंतर इस्रायलमध्ये शाळा, कॉलेज उघडण्यात आली आहेत. अनेक निर्बंध
उठवण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अलीकडंच केंद्र सरकारला पत्र
लिहून काही सूचना केल्या आहेत. इस्रायलनं जे धोरण अवलंबलं, तशाच
प्रकारच्या सूचना मनमोहन यांनी केल्या आहेत. याचाच संदर्भ देत शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका केली आहे.
' मनमोहन सिंग हे शांतपणे काम करणारे नेते आहेत. त्यांनी आपली 'मन की बात' मोदींपर्यंत पोहोचवली आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही जमतंय का
बघा,' असा चिमटा शिवसेनेनं मोदींना काढला आहे.
' पंतप्रधान मोदी यांचे मधल्या
काळात इस्रायलमध्ये फार कौतुक झाले. पण इस्रायलला जे जमले ते मोदींना आपल्या देशात
का जमवता आले नाही? करोनास पळवण्यासाठी व तेथील पांढऱ्या
कपड्यातील देवदूतांना बळ देण्यासाठी इस्रायलच्या राज्यकर्त्यांनी फालतू उपक्रम
साजरे केले नाहीत. जे ‘प्रॅक्टिकल’ आहे
तेच केले.
इस्रायल लोकसंख्येच्या तुलनेत लहान देश आहे. पण
या संकटकाळात तेथे विरोधकांच्या सल्ल्यांनाही महत्त्व देण्यात आले. इस्रायलमध्ये
कोणताही उत्सव साजरा न करता सार्वजनिक लसीकरण केले. त्यांनी संपूर्ण लसीकरण तर
केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले. फालतू राजकारण, थाळ्या किंवा टाळ्या पिटून करोना पळवणे या
नवटांक उद्योगांना थारा दिला नाही,' असा टोलाही शिवसेनेनं
हाणला आहे.
अशा भक्तमंडळाला कोण रोखणार?
' मोदी व इस्रायलच्या
राज्यकर्त्यांत मधुर संबंध मधल्या काळात प्रस्थापित झाले. पंतप्रधान बेंजामिन
नेतान्याहू हे मोदींना जवळचे मित्रच मानतात व नेतान्याहू यांनी त्यांच्या निवडणूक
प्रचारात मोदी यांच्या होर्डिंग्जचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मोदी नावाचा वापर
करून नेतान्याहू यांनी त्यांच्या देशातील करोना पळवून लावला असेही भक्त मंडळ बोलू
शकते. अशा प्रचारपंडितांना कोणी रोखायचे? ते तर सुरूच
राहणार. म्हणून मनमोहन यांची पंचसूत्री दुर्लक्षून चालणार नाही. मनमोहन यांचे
मार्गदर्शन राष्ट्रहितासाठीच आहे,' असंही शिवसेनेनं म्हटलं
आहे.
राहुल गांधींचे कौतुक
करोनाच्या संकटाला गांभीर्यानं घेणारे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचंही शिवसेनेनं कौतुक केलं आहे. ' राहुल गांधी यांनीही करोनाविरोधी
लढ्याला हातभार लावला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम
बंगालमधील सर्व सभा रद्द केल्या. हा सुद्धा कोरोना नियंत्रित करण्याचा धाडसी उपाय
आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
0 टिप्पण्या