Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना संकटामुळे मर्यादित १४ टेबलवरच मतमोजणी ; पंढरपूरचा निकाल रात्री ९ नंतरच येणार

 






लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पंढरपूर: पंढरपूर पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होत असून करोना संकटामुळे मर्यादित १४ टेबलवरच ही मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास रात्र होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. शासकीय गोदामात ही मतमोजणी होणार असून प्रशासनाकडून तयारीला सुरुवात झाली आहे.

मतमोजणीला येणाऱ्या प्रत्येकासाठी कोविड चाचणी सक्तीची असणार आहे. कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांनाही कोविड चाचणी करूनच मतमोजणी केंद्रात यावे लागणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.

एकाच हॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मतमोजणी होईल. मतमोजणीचे १४ टेबल असतील. प्रत्येक टेबलसाठी ४ कर्मचारी दिले जातील. उमेदवारांचे किमान ३०० प्रतिनिधी तसेच १६० मतमोजणी कर्मचारी हे मतमोजणी कक्षात असणार आहेत. मतमोजणीच्या ३८ फेऱ्या होणार असून निकालाचे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मिळण्यास सुरुवात होईल मात्र, अंतिम निकाल यायला रात्रीचे ९ ते १० वाजण्याची शक्यता गुरव यांनी बोलून दाखवली. मतमोजणीदरम्यान कोणत्याही कार्यकर्त्याला रस्त्यावर अथवा मतमोजणी केंद्राकडे येता येणार नसून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दर फेरीनंतर मतमोजणीची माहिती तिथे उपस्थित पत्रकारांना दिली जाणार असून टीव्ही माध्यमे, रेडिओ अथवा निवडणूक आयोगाच्या अॅपवर निकालाचे अपडेट्स मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ५२४ मतदान केंद्रावर २ लाख ३४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वृद्ध व अपंग मतदारांची टपालाने आलेली ३२८९ मते आहेत आणि माजी सैनिकांची ५४६ मते आहेत.


दरम्यान, महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली असतानाच पंढरपूरची पोटनिवडणूक झाल्याने पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांत रुग्णसंख्या वाढल्याचे दिसत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मतमोजणीसाठी प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी आवश्यकती सर्व पावले टाकली जात आहेत. कालच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मतमोजणीदरम्यान कोविड निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली जाईल. मतमोजणी केंद्राजवळ अधिकृत व्यक्ती सोडून कुणालाही जावू दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्तेही बॅरिगेटिंग लावून बंद केले जाणार आहेत. निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यासही मनाई करण्यात आलेली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या