लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई :- करोना
लसीकरणासंदर्भातील मोहिमेत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत ८०
लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता
लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा
होण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना
मुख्य सचिवसीताराम कुंटे यांनी दिल्या.
करोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य
सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सूकाणू समितीची बैठक मंगळवारी झाली.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिवांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा
आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन
करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास,
मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता आदी यावेळी
उपस्थित होते.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास
यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोस प्राप्त झाले असून
त्यापैकी ८८ लाख डोसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन
टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. ५ एप्रिल
पर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात
दररोज ४ लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे,
असे त्यांनी सांगितले.
८० लाखांहून अधिक लोकांना लसीकरण करून
महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल यंत्रणेचे कुंटे यांनी
अभिनंदन केले व लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना केल्या. ४५ वर्षांवरील
नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची राज्य सरासरी १२.३ टक्के असून भंडारा, कोल्हापूर, नागपूर,
मुंबई, पुणे, सांगली,
गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी
राज्य सरासरी पेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे,
मुंबई, नागपूर, नाशिक,
ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे
प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न
करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा पुरवठा
होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्य सचिवांनी सांगितले.
0 टिप्पण्या