Ticker

6/Breaking/ticker-posts

गाढवं चोरणारेही निघाले अखेर ‘गाढवच’..!

 

चाणक्ष मालकाच्या चिकाटीमुळे चोरांचा गाढवपणाउघडकीस








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगर :- ज्याला गाढवं विकायची, तीचचोरी करून पुन्हा दुसऱ्याला विकायची, असा प्रकार करणारे चोर मालकाचा चाणक्षपणा, चिकाटी आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे पकडले गेले. राहुरी तालुक्यातून थेट पंढरपूरला नेऊन विकलेली गाढवंही हाती लागली आणि चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गाढवावरून माती वाहतुकीचे काम करणाऱ्या रवींद्र बोरुडे यांनी आपले मित्र, नातेवाइक आणि पोलिसांच्या मदतीने चोरी गेलेली आठपैकी सहा गाढवं परत मिळवली आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील रवींद्र बोरुडे हे गाढवावरून माती वाहतुकीचे काम करतात. १६ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील मालुंजे येथून १६ मार्चला त्यांची आठ गाढवं चोरीला गेली होती. या प्रकरणात पोलिसांनी बेलापूर येथील दोघांसह पंढपूरमधील गाढवाच्या व्यापाऱ्याला अटक केली आहे. त्यानंतर गाढवांच्या चोरीची आणि तपासाची कहाणी उघडकीस आली. बेलापूर येथील बोरूडे यांनी एका घरासाठी माती वाहतुकीचे काम घेतले होते. त्यांची आणि मित्र भाऊसाहेब नवनीधे व रवी रोकडे यांच्या अशा आठ गाढवांच्या मदतीने माती वाहतुकीचे काम सुरू होते. १६ मार्चला काम संपवून ते घरी गेले. तेव्हा त्यांनी गाढवं पाथरे येथील मंदिराजवळ पायाला दोरी बांधून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी कामावर आले तेव्हा गाढवं जागेवर नव्हती. शोधाशोध करून सापडली नसल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

याशिवाय त्यांनी आपल्या पातळीवरही तपास सुरू ठेवला. आपले मित्र आणि नातेवाइकांना माहिती दिली. काही दिवसांनी त्यांच्या एका नातेवाइकाला पंढरपूरमध्ये बोरूडे यांच्याकडील एक गाढव असल्याचे दिसून आले. ही माहिती समजल्यावर बोरूडे यांनी मित्रांसह पंढरपूर गाठले. सगळी गाढवं सारखीच दिसत असली तरी, त्यांच्या मालकाला ती ओळखता येतात. बोरूडे आणि मित्रांनी तब्बल बारा दिवस पंढरपूरमध्येच तळ ठोकला. त्यांच्याकडील गाढवं तेथे असल्याचे त्यांना आढळून आले. ज्यांच्याकडे ती होती, त्यांनी आपण पंढरपूरमधील एका व्यापाऱ्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. खात्री पटल्यावर बोरूडे यांनी राहुरी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना पंढरपूरला बोलावून घेतले. पोलिसांनी चौकशी करून पंढरपूर येथील व्यापारी अहिनाथ जाधव याला पकडले. त्याच्याकडून सहा गाढवं ताब्यात घेतली.


मात्र, पंढरपूरचा व्यापारी नगर जिल्ह्यात येऊन चोरी कसा करू शकतो, हा प्रश्न पोलिसांना होता. अधिक चौकशी केल्यावर बेलापूर येथील अविनाश उर्फ सोन्या बोरुडे व ज्या गाडीमध्ये चोरी केलेली गाढवं पंढरपूरला पोहोच केले त्या गाडीचा चालक जमशेद पठाण यांची नावे उघड झाली. राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी स्वतः लक्ष घालून तपास केला. चौकशीत असे आढळून आले की आरोपी अविनाश बोरूडे हाच गाढवं विकायचा काम करायचा आणि विकलेली गाढवं पुन्हा चोरून बाहेर नेऊन विकायचा. गाढवांचा मालक आणि पोलिसांच्या चिकाटीच्या तपासामुळे ही चोरी उघडकीस आली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या