Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रातच करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक का? राज ठाकरेंनी सांगितलं कारण


 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः 'राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत आहे. हे महाराष्ट्रातच का दिसत आहे यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. आणि त्या राज्यांमध्ये करोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत,' असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 'लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेक करोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद केला,' असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

'मागच्या लॉकडाउनच्या वेळेला जेव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि करोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही,' असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

' छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी,' अशी मागणीही राज ठाकरेंनी केली आहे.

वीजबील कशी भरायची?

'लॉकडाऊनच्या काळात वीजबिल माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफ़िस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिल कशी भरायची?', असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं

'अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील करोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत. कंत्राटी कामगारांना सरकारने महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवं,' अशा सूचना यावेळी राज ठाकरे यांनी केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या