Ticker

6/Breaking/ticker-posts

रेमडेसिविरची तातडीने हवी तेवढी निर्मिती का होऊ शकत नाही?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : करोनाचे वाढते आकडे आणि यावर प्रभावी पर्याय असलेल्या रेमडेसिविरइंजेक्शनसाठी मेडिकलसमोर लागलेल्या रांगा सर्वांचीच चिंता वाढवत आहेत. सरकारही या इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण निर्मात्यांवरच काही मर्यादा आहेत, ज्यामुळे तत्काळ पुरवठा वाढवण्यासाठी अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात अनेक निर्मात्यांनी याचं उत्पादन अगदी शून्यावर आणलं होतं. कारण करोनाचा कहर कमी झाल्यामुळे मागणीही कमी झाली होती. पण एवढी मागणी वाढणं अनपेक्षित असल्याचं उत्पादकांचं म्हणणं आहे. यातून बाहेर येण्यासाठी किमान १० दिवसांचा कालावधी जातो, असं उत्पादक सांगतात.

सरकारकडून उत्पादनाचं लक्ष्य

महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा आहे. देशातील सध्याच्या सक्रीय केसेस १० लाखांच्या पुढे गेल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रालाच दररोज ४० ते ५० हजार रेमडेसिविर लागतात. पहिल्या लाटेत दररोज महाराष्ट्राला ३० हजारपर्यंत इंजेक्शनची गरज भासत होती. पण दुसऱ्या लाटेत या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

केंद्र सरकारने मायलन, हेटरो हेल्थकेअर, ज्युबिलंट लाईफ सायन्सेस, डॉ. रेड्डी लॅबोरेटरी, सिप्ला, झायडस कॅडिला आणि सन फार्मा या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या कंपन्यांना ३१.६ लाख इंजेक्शन प्रति महिना एवढं लक्ष्य देण्यात आलंय.

उत्पादनातील अडचणी

कंपन्यांना उत्पादनाचं लक्ष्य देण्यात आलं असलं तरी ते वाढवताना अनंत अडचणी आहेत. हेटरो हेल्थकेअरचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रफुल्ल खासगिवाल यांच्या मते, त्यांची कंपनी महिन्याला १०.५ लाख इंजेक्शनची निर्मिती करू शकते. पण डिसेंबर ते फेब्रुवारी उत्पादन अगदीच ५ ते १० टक्क्यांवर आलं होतं. कारण मागणीच नव्हती. मार्चच्या मध्यापासून आता उत्पादन पुन्हा वाढवण्यात आलंय, पण मागणीची पूर्तता करण्यासाठी काही वेळ जाणार आहे. उत्पादनासाठी कंपनीला २५ प्रकारचा कच्चा माल (सक्रिय औषधी घटक) लागतो, असंही ते म्हणाले. हे सगळं मागवावं लागतं आणि आमचे पुरवठादार तातडीने हा माल देऊ शकत नाहीत, असं ते म्हणाले. सध्या हेटरोकडून एक ते दोन दिवसाला ३५ हजार इंजेक्शनचं उत्पादन केलं जातं.

कशी आहे उत्पादन प्रक्रिया?

रेमडेसिविरच्या उत्पादनासाठी ५ दिवस लागतात. यानंतर १४ दिवसांची एक चाचणी होते आणि वाहतुकीसाठी ३ दिवस लागतात. रेमडेसिविरची वाहतूक करण्यासाठी २-८ डिग्री तापमानाची आवश्यकता असते. या सर्व प्रक्रियेला २०-२५ दिवस लागतात. अनेक उत्पादकांनी मार्च महिन्यातच उत्पादन वाढवलं आहे. पण कच्च्या मालाचा पुरवठा आणि वाहतूक ही सध्याची मोठी अडचण आहे. कारण, अनेक राज्यात वाढत्या करोना रुग्णांमुळे निर्बंधही लादण्यात आले आहेत.

सिप्लाने ईटीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सर्व ऑर्डर्स स्वीकारल्या असून पुरवठा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक राज्यांकडून कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या