Ticker

6/Breaking/ticker-posts

तर करोनाच्या त्सुनामीत गटांगळ्या खाण्याची वेळ देशावर आली नसती: शिवसेना

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: 'करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी दिलेला इशारा केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेतला असता आणि काही गोष्टींची पूर्वखबरदारी, पूर्वतयारी केली असती तर आज करोनाच्या त्सुनामीत गटांगळ्या खाण्याची वेळ देशावर आली नसती,' अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे

देशात रोजच्या रोज करोना रुग्णवाढीचा उच्चांक गाठला जात असून मृत्यूचा आकडाही भयंकर प्रमाणात वाढत आहे. मे महिन्यात भारतात रोजचा करोना मृतांचा आकडा पाच हजारांवर पोहोचू शकतो, असा इशारा अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्यूशननं दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारनं वेळीच उपाययोजना न केल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे.

' गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी देखील परदेशी संस्थांनी असे इशारे दिले होते. पण सुदैवानं परिस्थिती आटोक्यात राहिली होती. त्यामुळं या इशाऱ्यांबाबत सरकार समर्थक मंडळींकडून शेरेबाजीही करण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती तशी नाही हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. करोनाची दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल, या तज्ञांच्या इशाऱ्यांनाही केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेतलेलं नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज नवे करोना रुग्ण आणि मृतांची संख्या याचे जागतिक विक्रम नोंदविले जात आहेत. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत. वॉशिंग्टनच्या संस्थेने दिलेला हा इशारा आता तरी केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा,' अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे.


' आता सरकारतर्फे देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेद्वारे केला जात आहे, त्यासाठी लष्कराचेही सहाय्य घेतले जात आहे. करोना लस, वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे यांच्या सीमाशुल्कात सूट देण्याचाही निर्णय केंद्राने घेतला आहे. रेमडेसिवीरसारख्या अत्यंत तुटवडा जाणवणाऱ्या इंजेक्शनचाही पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. हे सगळे ठीकच आहे, पण बेकाबू होऊ पाहणाऱ्या करोनाचे काय? हतबल झालेली आरोग्य व्यवस्था, उपचारांअभावी होणारे रुग्णांचे मृत्यू आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय? सरकारकडून जे उपाय केले जात आहेत त्यामुळे भविष्यात करोना त्सुनामीचा प्रकोप कमी होईलही, पण तोपर्यंत ना गेलेले जीव परत येतील, ना त्यांची उद्ध्वस्त कुटुंबे सावरले जातील,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या