लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: ब्रुक फार्मा
कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू
असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांचे पोलिस ठाण्याला भेट देत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे फडणवीस
यांना अडचणीचे ठरू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा
सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबतचा निर्णय
सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरील संभाव्य कारवाईचे
संकेत दिले. यावेळी त्यांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी का
बोलावण्यात आले हे स्पष्ट केले. राज्यात ५० हजार रेमडेसिवीरचा साठा येणार, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्र आहे याची माहिती मात्र पोलिसाकडे
नव्हती. सुरुवातीला पुरवठादाराने ते पत्र दाखवले देखील नव्हते. त्यामुळे पोलिसांनी
ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले.
मात्र, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात
पोहोचले. तेथे फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा शासकीय कामात हस्तक्षेप होता.
त्यामुळे चौकशीत बाधा आली, असे सांगतानाच हे चुकीचे असून
पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असेही
वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून गृहमंत्र्यांना
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या संदर्भात
माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. या
कंपनीकडे असलेला रेमडेसीव्हर इंजेक्शनचा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता, तर
तो एका खासगी पार्टीला देण्यात येणार होता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती
ब्रुक फार्माला केली होती. त्यावर त्याने नकार दिला होता. मात्र, त्यामुळे हा साठा कोणाला दिला जाणार होता, याची
चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या