लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: राज्यातील कोविड संसर्गाची भीषण स्थिती लक्षात घेता १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश आधीच देण्यात आलेला असताना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या आदल्या दिवशी राज्यातील जनतेला संबोधित केले
व महत्त्वाचे आवाहन केले. राज्यात सध्या जे निर्बंध लादले आहेत ते पुरेसे आहेत.
यापेक्षा अधिक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही असे मला वाटते, असे महत्त्वाचे विधान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
संपूर्ण देश आज करोनाच्या खदखदत्या
ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रात आपण निर्बंध घातले नसते व संयम दाखवला
नसता तर महाराष्ट्राची स्थितीसुद्धा आज भीषण झाली असती. सुदैवाने गेले काही दिवस
आपल्या राज्यातील करोनाचे आकडे स्थिर झाले आहेत. ते आकडे कमी करण्यासाठी,
करोना नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला यापुढेही संयम दाखवायचा
आहे, असे
नमूद करत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांचाही तपशील दिला. आपण लॉकडाऊन केला आणि
हात लॉक करून ठेवलेत असे झालेले नाही. आपण हातपाय हलवत आहोत. फिल्ड हॉस्पिटलची
संख्या आपण वाढवली आहे. आता राज्यात साडेपाच हजार कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत.
ऑक्सिजन सुविधा, बेड्स याबाबत आपण सातत्याने काम करत आहोत.
आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर आपला भर आहे, असे
मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या