Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन ?; उद्या ३० एप्रिलला अंतिम निर्णय..

 







लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई: राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाऊनबाबत चर्चा झाली मात्र कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. राज्यातील कोविड-स्थिती लक्षात घेता सध्या जे लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत ते १५ मे पर्यंत वाढवले जावेत असे मत बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले असून ३० एप्रिल रोजी यावर निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यातील करोना संसर्गाची भीषण स्थिती लक्षात घेता लॉकडाउन वाढवावा लागणारच आहे. यावर सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे आता नेमका १५ दिवस लॉकडाऊन वाढवायचा की त्यापेक्षा कमी वा अधिक दिवस याबाबत निर्णय घ्यायचा असून ३० एप्रिल रोजी त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले. १५ दिवसांच्या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब होऊ शकते असा माझा अंदाज असल्याचेही ते पुढे म्हणाले.

राज्यात १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत कठोर निर्बंध लागू आहेत. त्यासोबत संचारबंदीचा आदेशही लागू आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्बंध लादण्यात आल्यानंतर राज्यात काही सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. सोमवारी (२६ एप्रिल) राज्यातील नवीन बाधितांचा आकडा ४८ हजारांपर्यंत खाली आला होता. तर दुसरीकडे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवल्यास करोनावर नियंत्रण मिळवण्यात मदत होणारच आहे शिवाय आरोग्य यंत्रणेवरील ताणही त्यातून कमी होणार आहे. आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगाने काही तातडीची कामे तडीस नेण्यासही हातभार लागणार आहे. यासाठीच लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही मंत्रिमंडळ बैठकीआधी लॉकडाऊन वाढवण्यात यावा असे माझे स्पष्ट मत असल्याचे नमूद केलेले आहे. लॉकडाऊनमुळे नाशिकमधील रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या