लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई:- नको असतानाही मिळालेल्या
भाडेवाढीमुळे आधीच दुरावलेला प्रवासी वर्ग आणि आता एकावेळी २ प्रवासी घेण्याची
मर्यादा यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांच्या अडचणींत वाढच होणार आहे. वाहनांचे हप्ते, शैक्षणिक खर्च, घरातील दैनंदिन खर्च हे आणि असे अनेक खर्च कायम असताना आर्थिक कमाईवर कडक
निर्बंध घालण्यात आल्याने रिक्षा-टॅक्सी चालकांची पंचाईत होणार आहे. कमाई नसेल तर
आम्ही आणि आमच्या कुटुंबियांनी जगायचे कसे? असा प्रश्न
चालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
स्वयंरोजगार या प्रकारात रिक्षा-टॅक्सी धंदा येतो. आज, मंगळवारपासून रिक्षा-टॅक्सीतून सोमवार ते शुक्रवार २ प्रवासी वाहतुकीला
मुभा आहे. शनिवार-रविवारी राज्यात पूर्ण लॉकडाउन असणार आहे. राष्ट्रीय लॉकडाउननंतर
स्वयंरोजगाराचे अर्थचक्र पूर्णपणे थांबले. यामुळे झालेल्या नुकसान भरुन
काढण्यासाठी चालकांचे प्रयत्न होत असतानाच आता पुन्हा राज्यात लॉकडाउन लागू
असल्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालक हतबल झाले आहेत. करोना रोखण्यासाठी निर्बंध असणे ठीक आहे, पण आमच्या रोजीरोटीचे काय? असा प्रश्न ते उपस्थित
करीत आहेत. पुढचे काही दिवस अडचणींचे असतील, अशी भावना
त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने केलेल्या भाडेवाढीमुळे प्रवासी
दुरावला आहे. कमाई करण्यासाठी आता मीटरपेक्षा शेअर वाहतुकीलाच प्राधान्य देण्यात
येईल. किमान घरखर्च आणि रिक्षांची देखभाल तसेच इंधन खर्च तरी निघावा यासाठी हा
पर्याय स्वीकारण्यात आल्याचे रिक्षाचालक सांगतात. रिक्षा-टॅक्सी चालकांनी सरकारकडे
आर्थिक मदतीची मागणी केली होती. याची सरकारकडून पूर्तता करण्यात आली नाही. आर्थिक
कमाईवर निर्बंध लादल्यानंतर आर्थिक मदत किंवा सरकारकडून कोणत्याही मदतीची घोषणा
झालेली नाही. यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये नाराजी आहे.
0 टिप्पण्या