लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ .नगर - जागतिक महामारी कोरोनाने सर्वत्र हाहा:कार माजवलेला आहे. समाजातील प्रत्येक घटक या संकटामुळे प्रभावित झाला असून, रूग्णसंख्या बेसुमार वाढते आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. आरोग्य यंत्रणा तोकड्या पडू लागल्या आहेत. याच पद्धतीने सर्वत्र रक्तपेढ्याही प्रभावित झालेल्या आहेत. तसेही कोरोनाच्या भीतीमुळे लोक रक्तदान करायला पुढे येत नाहीत. लसीकरणाच्या पूर्ण डोसनंतर 28 दिवस रक्तदान करता येत नसल्याकारणाने स्वेच्छा रक्तदात्यांच्या संख्येतसुद्धा कमालीची घट झालेली आहे. त्यामुळेच सद्य परिस्थितीत रक्तदान करून रुग्णांना जीवनदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अष्टविनायक ब्लड सेंटरचे संचालक डॉ. शैलेंद्र पाटणकर यांनी केले आहे.
वर्षभरापासून महाविद्यालय व कॉलेज बंदच आहेत. सध्या लागू असलेल्या निर्बंधांमुळे व अंशत: लॉकडाऊनमुळे खाजगी उद्योग क्षेत्रातील कंपन्या व देवस्थाने बंद आहेत. रक्तदान शिबिरे घेण्यात वर नमूद केलेल्या संस्थांचा मोठा वाटा असतो. परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे या सर्व संस्थांद्वारे आयोजित केली जाणारी रक्तदान शिबिरे बंद आहेत. त्यामुळे रक्तदात्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे. पुढील काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.
बर्याचशा कोरोना रूग्णांनासुद्धा रक्ताची व प्लाझ्मासारख्या रक्तघटकांची गरज भासते. या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्याचा उद्देश हाच आहे की, रक्ताच्या भीषण तुटवड्यासंदर्भातील परिस्थिती आपल्यासमोर मांडावी. या संकटाला तोंड देण्यासाठी आमचे सर्व सजग नागरिक, युवावर्ग, राजकीय पुढारी मंडळी व विविध व्यावसायिक संघटनांना कळकळीची एकच विनंती आहे की, आपण सर्वांनी पुढाकार घेऊन छोटी छोटी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, तसेच आपले सर्व कार्यकर्ते, संघटनेचे सभासद यांना रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्मास प्रोत्साहित करावे. आपल्या सर्वांना एकच नम्र आवाहन चला रक्तदान करा, कोरोना काळात जीवनदान द्या, असे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या