Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगरमध्ये एकाच शववाहिकेत कोंबले सहा मृतदेह, स्मशानातही रांगा

 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

*नगरमध्ये करोना मृतांचा आकडा वाढला

*महापालिका रुग्णालयातील सुविधा पडू लागल्या अपुऱ्या

*स्मशानात ओटे कमी पडू लागल्यानं जमिनीवरच अंत्यसंस्कार

अहमदनगर:  कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना नगरमध्ये आता मृत्यूंचे तांडव सुरू झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच अमरधाममधील अंत्यविधी करणारी यंत्रणाही कोलमडली आहे. महापालिकेकडे एकच शववाहिनी असल्याने एकाचवेळी अनेक मृतदेह कोंबून नेले जात आहेत. तर विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. वर्षभरापूर्वी अशाच अडचणी आल्या होत्या. मात्र, त्यावर ना महापालिकेने उपाय केला, ना जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घातले. त्यामुळे करोना बाधितांच्या मृत्यनंतरही नातेवाईकांच्या भावनेशी खेळ सुरूच आहे.


काल रात्री नगर शहरातील अंत्यसंस्काराचे विदारक चित्र समोर आले. एका शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून नेण्यात आले. महापालिकेची यासंबंधीच यंत्रणा अपुरी असल्याने ही वेळ आल्याचे कर्मचारी सांगतात. नगरच्या रुग्णालयांत शहरासोबतच ग्रामीण भागातील रुग्णही दाखल होतात. त्यांचा मृत्यू झाल्यावर नियमाप्रमाणे मृतदेहांवर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतात. यासाठी नगरच्या अमरधाममधील विद्युत दाहिनीचा वापर केला जातो. मात्र, तेथे दिवसाला केवळ २० अंत्यसंस्कार होऊ शकत आहेत. त्यासाठी नातेवाकाईंना तासंतास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने अंत्यस्कार करण्यासही सुरुवात झाली आहे. त्यासाठी ओटे अपुरे पडत असल्याने जमिनीवरच सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे. गेल्या वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. शववाहिकेतून एकाचवेळी १२ मृतदेह नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी आणखी एक शववाहिनी घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत अशी व्यवस्था झालेली नाही. पूर्वी एकच विदयुत दाहिनी सुरू होती, आता दुसरी कार्यान्वित केल्याने तेवढा फरक मात्र पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या