लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगरः राज्यात आणि नगर जिल्ह्यातही रेमडेसिवीर इंजेक्शनाचा
तुटवडा आणि त्यावरून राजकारण सुरू आहे. अशा परिस्थितीत नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीहून तीनशे रेमडेसिव्हिर
इंजेक्शन आज नगर जिल्ह्यात आणली. शिर्डी संस्थान, प्रवरा
रुग्णालय आणि नगरच्या सरकारी रुग्णालयाला ती मोफत देण्यात आली. याचे वितरण
केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार
टीका केली.
करोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या या इंजेक्शनचा
मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यासंबंधी मुंबईत घडलेल्या एका घटनेवरून भाजप आणि
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. अशा परिस्थिती डॉ.
विखे यांनी थेट दिल्लीला जाऊन तेथून ही इंजेक्शन आणली आहेत. मोठ्या प्रमाणात
इंजेक्शन आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, केवळी तीनशेच उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी
येथील रुग्णालयांना ती मोफत दिली आहेत. मात्र, दिल्लीत
त्यांना ती कशी आणि कोठून उपलब्ध झाली, हे मात्र सांगण्यात
आलेले नाही.
आज दुपारी ही इंजेक्शन विमानाने शिर्डीला
पोहचली. त्यानंतर ज्येष्ठ नेते विखे यांच्या हस्ते यातील शंभर इंजेक्शन शिर्डी
संस्थानच्या कोविड केअर सेंटरला मोफत देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी गोविंद
शिंदे, साई संस्थानचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, शिर्डीचे
नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र
गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय
शेळके नगररसेवक, सुजित गोंदकर, तालुका
आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के उपस्थित होते. यातील शंभर इंजेक्शन प्रवरा
ग्रामीण रुग्णालयाला तर शंभर नगरच्या जिल्हा रुग्णालयाला देण्यात येणार आहेत.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, 'सध्याच्या परिस्थितीत कोण काय बोलतो यापेक्षा
प्रत्यक्ष काम करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या पाठीशी उभं
राहण्याचे ठरविले आहे. करोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे.
आपले हे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. या
गडबडीत निरपराध लोकांचा हकनाक बळी जात आहे. मंत्री येतात आणि आश्वसने देऊन जातात,
पुढे काहीच होत नाही. परिस्थिती हातळण्यास हे सरकार हतबल झाले आहे.
आम्ही मात्र जनतेसोबत कायम राहणार आहोत.'
0 टिप्पण्या