लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आज (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल, मेट्रो, मोनो प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशाला संबोधित करताना लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे विधान केले होते. लॉकडाऊन हा शेवटचा
पर्याय असला पाहिजे असे त्यांनी राज्यांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेतं याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मंगळवारी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत सर्वच प्रमुख मंत्र्यांनी कडक
लॉकडाऊनसाठी आग्रह धरला होता. बैठकीनंतर छगन भुजबळ, एकनाथ
शिंदे, राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड यांनी तशी विधानेही
केली होती. राज्यातील करोनाची स्थिती लक्षात घेता कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय
नसल्याचे या सर्वांचेच म्हणणे होते. त्यानुसार अखेर आज निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाऊनबाबत गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.
ब्रेक द चेन अंतर्गत नवा आदेश जारी
करण्यात आला आहे. या आदेशानुसार राज्य सरकारी,
केंद्रीय आणि स्थानिक प्रशासनातील सर्व शासकीय कार्यालये आता फक्त
१५ टक्के कर्मचारी क्षमतेने चालवावी लागणार आहेत. लग्न समारंभासाठी फक्त दोन तास
हॉल बूक करता येईल. लग्नाला केवळ २५ जणच उपस्थित राहू शकतील. या नियमाचे उल्लंघन
झाल्यास संबंधित कुटुंबांवर ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याशिवाय कोविड
निर्बंध लागू असेपर्यंत संबंधित हॉल बंद ठेवावा लागणार आहे. खासगी प्रवासी वाहतूक
(बस वगळता) केवळ अत्यावश्यक कारणासाठी करता येईल. चालक अधिक आसन क्षमतेच्या ५०
टक्के प्रवासीच त्यातून प्रवास करू शकतील. अत्यावश्यक सेवा किंवा मेडिकल
इमर्जन्सीसाठीच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात
जाता येणार आहे. हा नियम मोडल्यास संबंधिताला १० हजार रुपये दंड केला जाणार आहे.
खासगी बस ५० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी असणार आहे. या बसने दुसऱ्या शहरात
वा जिल्ह्यात जाणाऱ्याला १४ दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. तसा स्टॅम्प
मारण्याची जबाबदारी बस ऑपरेटरवर राहणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच
स्थानिक परिवहन सेवा ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत.
लोकल,
मेट्रो व मोनो रेल्वे प्रवासावरही निर्बंध आणले गेले आहेत.
सामान्यांसाठी या सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. शासकीय कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच उपचारांची गरज असलेली व्यक्ती व दिव्यांग
यांनाच लोकलने प्रवासाची मुभा असणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र
दाखवल्यानंतरच तिकीट वा पास मिळणार आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेने राज्यात एका
जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वा दुसऱ्या शहरात जायचे असल्यास १४ दिवस होम
क्वारंटाइन सक्तीचे असणार आहे.
0 टिप्पण्या