लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव :- शेवगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक नंदकिशोर रामबिलास सारडा (वय ५५) यांचे आज सोमवारी सकाळी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गेल्या वर्षभरापासून कोविड रुग्णांसाठी अहोरात्र काम करणारा सच्चा कार्यकर्ता शेवगावकरांनी गमावला आहे. त्यांचे निधनाने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. दुपारी त्यांचे पार्थिवावर नाथापूर (जि.बीड) या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माहेश्वरी समाज संस्थेचे राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले स्वर्गीय नंदकिशोर सारडा हे मूळचे नाथापूर, (जि बीड) येथील रहिवासी आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते शेवगाव येथे व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्याला होते. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देण्याचा त्यांचा पिंड होता. सर्व जाती-धर्माच्या सुख,दुःखात ते कायम अग्रभागी असायचे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सर्वधर्मीय लग्न समारंभ, अंत्यविधी कार्यक्रमात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच त्यांची शेवगाव शहराशी नाळ जुळली.त्यांनी सलग दोनदा ग्रामपंचायतीत तर, एकदा नगरपालिकेत लोकसेवक म्हणून जनतेचे प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व केले. गेल्यावर्षीच्या कडक लॉकडाउनच्या काळात त्यांनी कोविड रुग्णांसाठी तसेच परराज्यातील स्थलांतर मजुरांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था करून त्यांना मायेचा आधार दिला. सध्या ते याच कामात व्यस्त असताना काळाने त्यांचेवर झडप घातली.
अजातशत्रू, उत्तम समन्वयक व प्रशासक, निस्पृह व्यक्तिमत्व आणि शेवगावकरांच्या मनात आदराचे स्थान मिळविणारे ते अलौकिक व्यक्तिमत्व होते.सर्व राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले. त्यांचे पश्चात आई, भाऊ, बहिण, पत्नी, एक विवाहित मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या