लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई:- बॉलीवूडमधील ज्येष्ठ गीतकार जावेद
अख्तर यांची
बदनामी केल्याच्या आरोपांची दखल घेत अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने प्रोसेस
जारी करत सुरू केलेली कायदेशीर कार्यवाही रद्द करावी, ही
अभिनेत्री कंगना रणोटची विनंती दिंडोशी सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
'अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक
टीव्हीवर या वाहिनीचे मुख्य संपादक यांनी
घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने माझ्याविरोधातही बिनबुडाचे आरोप केले. तसेच माझी नाहक
बदनामी करणारी विधाने केली', अशी तक्रार अख्तर यांनी अॅड. जय
भारद्वाज यांच्यामार्फत अंधेरी न्यायालयात केली आहे. याविषयी पोलिसांच्या अहवालाची
दखल घेऊन न्यायालयाने कंगनाला समन्स बजावले होते. तरीही ती हजर न राहिल्याने
न्यायदंडाधिकारी ए. ए. खान यांनी १ मार्चला प्रोसेस जारी करत तिच्याविरोधात
जामीनपात्र वॉरंट काढले होते. त्याविरोधात कंगनाने अॅड. रिझवान सिद्दिकी
यांच्यामार्फत सत्र न्यायालयात फेरविचार अर्ज केला होता.
न्यायदंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले समन्स व सुरू
केलेली कायदेशीर कार्यवाही रद्द करावी, अशी विनंती तिने केली होती. मात्र, याविषयीच्या
सुनावणीअंती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी ३ एप्रिलला आपला निर्णय
राखून ठेवला होता. तो सोमवारी जाहीर करताना अर्ज फेटाळला असल्याचे न्यायाधीशांनी
स्पष्ट केले. दरम्यान, कंगनाने न्यायालयात हजेरी लावल्यानंतर
न्यायदंडाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच कंगनाविरोधातील वॉरंट रद्द केले.
0 टिप्पण्या