लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्ली :-देशाची राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी देशातील १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी एक बैठक घेतली.
या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील सहभागी होते. यावेळी
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दिल्लीच्या रुग्णालयांतील ऑक्सिजनच्या
तुटवड्यासोबतच आरोग्याच्या सोई-सुविधांबाबतीत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी
केंद्रासमोर दिल्लीच्या सद्य परिस्थितीची माहिती देतानाच पंतप्रधानांसमोर काही
प्रश्नही उपस्थित केले. व्हर्च्युअल पद्धतीनं आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी
आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा,
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, छत्तीसगडचे
मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य
प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गुजरातचे
मुख्यमंत्री विजय रुपाणी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री
पलानीस्वामी हेदेखील उपस्थित झाले होते.
' दिल्लीत ऑक्सिजन उत्पादन संयंत्र नाहीत त्यामुळे आम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही का?' असा उद्विग्न सवाल मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांना विचारला. तसंच 'कृपया मला सांगा की दिल्लीत येणारे ऑक्सिजन टँकर इतर राज्यांत रोखले जात असतील तर मी केंद्र सरकारमध्ये कुणाशी बोलू?' असं म्हणत दिल्ली सरकारला तोंड द्याव्या लागणारा कळीचा प्रश्नही अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांसमोर मांडलाय.
मुख्यमंत्री असुनही लाचार
१० मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या
बैठकीत अरविंद केजरीवाल यांना बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपण 'लाचार'
असल्याचं म्हणत, मुख्यमंत्री असतानाही आपण
दिल्लीसाठी काही करू शकत नसल्याचं म्हटलंय. राजधानीत ऑक्सिजनची कमतरता असेल तर
मदतीसाठी कुणाशी बोलू? ऑक्सिजनचे टँकर इतर राज्यांत अडवले
जात असतील तर कुणाला फोन करू? असे प्रश्न मांडताना
पंतप्रधानांनी स्वत: यात लक्ष घालावं अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केलीय.
सर्व ऑक्सिजन प्लान्टची जबाबदारी सेनेच्या ताब्यात देण्याची मागणी
करोना संक्रमणाच्या लढाईत अतिशय
महत्त्वाचा ठरणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याबद्दलही केजरीवाल यांनी काही सूचना
केल्या. यावेळी त्यांनी आपल्याला एक 'राष्ट्रीय योजना' आखणं आवश्यक असल्याचं सांगत देशातील सर्व ऑक्सिजन प्लान्टची जबाबदारी
सेनेच्या ताब्यात देण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. प्रत्येक
टँकरसोबत लष्कराचा एस्कॉर्ट व्हेईकल असेल तर तो टँकर कुणीही थांबवणार नाही. शक्य
असेल तर तातडीनं हवाई मार्गानं उपलब्ध करून द्या अथवा तुमच्या योजनेनुसार,
'ऑक्सिजन एक्सप्रेस'च्या सहाय्यानं दिल्लीला
ऑक्सिजन पुरवा, असं केजरीवाल यांनी पंतप्रधानांना म्हटलंय.
लसीचे दर केंद्र व राज्यासाठी वेगळे, असं का?
अरविंद केजरीवाल यांनी लसीचे दर केंद्र सरकारसाठी
वेगळे आणि राज्य सरकारसाठी वेगळे, असं का? म्हणत लसीकरणा संदर्भातही प्रश्न उपस्थित
केला. लस बनवणाऱ्या कंपनीनं केंद्र सरकारला लस १५० रुपयांत तर राज्य सरकारला ४००
रुपयांत देणार असल्याचं सांगितलंय. एकाच देशात लसीसारख्या गोष्टीची किंमत वेगवेगळी
कशी असू शकते? संपूर्ण देशाला एकाच किंमतीत लस उपलब्ध
व्हायला हवी, असंही केजरीवाल यांनी म्हटलंय.
0 टिप्पण्या