लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आताचे वास्तव समोर ठेवतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची आणखी लाट आलीच तर महाराष्ट्र त्यासाठी कसा सज्ज असेल याबाबत महत्त्वाची माहिती आज दिली. राज्यात येऊ शकणाऱ्या कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व शहिदांना त्यांनी अभिवादन केले. कोविडमुळे सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा लागत असला तरी पुढे करोना संकटावर मात करून महाराष्ट्र दिन आपण सुवर्णदिन म्हणून उत्साहात साजरा करू, असा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
निर्बंधांमुळे
राज्यात रुग्णसंख्या स्थिरावली
राज्यात आतापर्यत ४५ वर्षांवरील १ कोटी ५८ लाख
नागरिकांचे लसीकरण झाले आहे. हा देशात विक्रम ठरला आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की,
करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर
नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने १५ मे पर्यंत कडक निर्बध लागू केले असून ते
अत्यंत गरजेचेच आहेत. नागरिकांनी या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शासनाला
सहकार्य करावे. राज्यात २७ मार्च रोजी जमावबंदी आणि काही प्रमाणात निर्बंध
लावण्यात आले. त्यादिवशी ३५ हजार रुग्ण आढळले होते तर तेव्हा राज्यात एकूण सक्रिय
रुग्णांची संख्या ३ लाख ३ हजाराच्या आसपास होती. काल दिनांक २९ एप्रिल रोजी
राज्यात ६ लाख ७० हजार ३०१ सक्रिय रुग्ण होते. रुग्णांची अशाप्रकारे होणारी वाढ
लक्षात घेऊन एप्रिल अखेरीस राज्यात १० ते ११ लाख रुग्ण संख्येचा अंदाज वर्तवण्यात
आला होता. कडक निर्बंधांनंतर लगेचच रुग्णसंख्या कमी झाली नसली तरी मागील काही
दिवसांपासून ती स्थिरावण्यास मदत झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील
आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ
राज्यात आजघडीला ६०९ चाचणी प्रयोगशाळा आहेत, एकूण ५५९९ कोविड केअर सेंटर्स आहेत.
सर्वप्रकारचे मिळून जवळपास ५ लाख बेड्स राज्यात उपलब्ध आहेत. वाढती रुग्णसंख्या
विचारात घेऊन मुंबईसह सर्व राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
करण्यात येत आहे. ऑक्सीजन बेडची संख्या ४२८०० वरून ८६ हजार इतकी वाढवली आहे,
आयसीयु बेडची संख्या जून २०२० च्या तुलनेत ११८८२ वरून २८९३९ इतकी
केली आहे. व्हेंटिलेटर्ससह इतर सर्वप्रकारच्या आरोग्य सुविधांमध्ये आपण वाढ करत
आहोत. गॅस ऑक्सिजनची वाहतूक करणे कठीण असल्याने महाजेनकोच्या खापरखेडा, अकोला आणि परळीच्या वीज केंद्रानजीक मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धतेसह
जम्बो सुविधा उभ्या करण्यात येत आहेत. रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पाजवळ जम्बो
केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. पेणमधील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रुग्णालयात
जम्बो कोविड सेंटर सुरू होत आहे तर लॉयल स्टील वर्धा परिसरात १ हजार बेड्सची जम्बो
सुविधा उभारण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ऑक्सिजनचे
नियोजन
राज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते.
आज प्रत्यक्षात आपण १७०० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज वापरतो. त्यात ५०० मेट्रेक टन ऑक्सिजनचा
कोटा केंद्र सरकारने राज्याला इतर राज्यातून आणण्यासाठी ठरवून दिला आहे. हा
ऑक्सिजन आपण स्वखर्चाने आणत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रुग्णसंख्या
मर्यादित राहण्यावर ऑक्सिजनची गरज अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रेमडेसिवीरचा
निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या
ऑक्सिजनप्रमाणेरेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी राज्यात वाढत आहे. रोज आपली गरज ५० हजारांची आहे. परंतु
केंद्राकडून २६ हजार ७०० च्या आसपास इजेक्शन्स उपलब्ध करून दिली जात होती. त्यात
वाढ करण्याची पंतप्रधानांकडे मागणी केल्यानंतर ४३ हजारापर्यंत वाढ झाली पण
प्रत्यक्षात ३५ हजार इंजेक्शन्स राज्याला मिळत असल्याचे व आपण त्याचे पैसे देत
असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. रेमडेसिवीरचे दुष्परिणाम टाळण्यासाठी
गरज नसेल तर रेमडेसिवीरचा वापर न करण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने आणि टास्क
फोर्सच्या तज्ज्ञांनी दिला आहे. यासंदर्भातील निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना केले.
रोजीरोटीची
काळजी
करोनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाला
आहे. अर्थगती मंदावली आहे. निर्बध लावावे लागत आहेत. असे असले तरी गोरगरिबांची
रोजीरोटी बंद होणार नाही याची काळजी शासनाने घेतली असून जाहीर केलेल्या ५५०० कोटी
रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची राज्यात तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याचे
मुख्यमंत्री म्हणाले. मोफत शिवभोजन थाळीचा १५ लाखांहून अधिक नागरिकांनी लाभ
घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या योजनेत आतापर्यंत चार कोटी लोकांनी
या थाळीचा अस्वाद घेतल्याचे ते म्हणाले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह इतर ९
सामाजिक सुरक्षा योजनेतील दोन महिन्यांचा १४२८ कोटी रुपयांचा निधी
जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सात कोटी
नागरिकांना एक महिन्यासाठी ३ किलो गहू आणि २ किलो तांदुळ राज्य शासनाच्यावतीने
मोफत देण्यास सुरुवात झाली असून इमारत व बांधकाम मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या १३
लाख कामगारांपैकी ९ लाख १७ हजार कामगारांच्या बँक खात्यात १५०० रुपयांचे अनुदान
जमा केल्याचेही ते म्हणाले. १ लाख ५ हजार घरेलू कामगारांना १५ कोटी ८२ लाख
रुपयांचा निधी वितरित झाला आहे. यास्तव ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, नगरविकास विभागामार्फत नोंदणीकृत
फेरीवाल्यांना मदत करण्यात येत असून त्यासाठी ६१.७५ कोटी रुपये दिले आहेत तसेच ११
लाख आदिवासी बांधवांना २ हजार रुपयांचे खावटी अनुदान देण्यात येत असल्याची
माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नोंदणीकृत रिक्षा चालकांनाही १५०० रुपयांची मदत
करण्यात येत आहे तर ३३०० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा उभ्या
करण्यासाठी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्य सुविधा उभ्या करणे, ऑक्सिजन, रेमडेसिवीरची
उपलब्धता असो किंवा अन्य काही, कुठल्याही गोष्टीत सरकार
काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी
दिली. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सुविधांची उभारणी करताना
अर्थचक्र थांबू नये म्हणून राज्यातील उद्योजक आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींशी आपण
बोललो असून त्यादृष्टीने कामाची आणि कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्याची
विनंती केल्याचेही ते म्हणाले. येणाऱ्या पावसाळ्यात जम्बो कोविड केंद्रामध्ये पाणी
जाणार नाही, अपघात घडणार नाहीत यासाठी स्ट्रक्चरल आणि फायर
ऑडिट करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. येणारा काळ लग्नसराईचा असल्याने गर्दी
होऊ नये यासाठी २५ जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्याचेही
त्यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या