“राजकारणाचा डोस कमी करुन केंद्राने कोरोनावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती
नियंत्रणात असती”
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबईः 'भारतातील करोनाच्या पहिल्या लाटेस चीन जबाबदार असेलही, पण आज जे दुसरे तुफान उठले आहे. त्यास सर्वस्वी
जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारचं आहे,' असा
घणाघात शिवसेनेनं केला आहे. तसंच, राजकीय स्वार्थासाठी
करोनाची पर्वा न करता दिल्लीश्वरांनी महामारीची लाटच निर्माण केली आहे, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यातही करोनाचा संसर्ग
वेगानं पसरत आहेत. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर्स व बेडची कमतरता जाणवत आहे. यावरुन
शिवसेनेनं केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच, पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या प्रचारावरुनही
शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे.
' करोनाच्या पहिल्या संकटाचे खापर
सरकारने चीनवर फोडले. हे सर्व चीनच्या वुहान प्रांतातील मासळी बाजारातून पसरले.
त्यामुळे जगाच्या वाताहतीस फक्त चीन आणि चीनच जबाबदार आहे हे सगळय़ांनीच ठरवून
टाकले. पण आता चीन कोठे आहे? चीनची अर्थव्यवस्था वेगाने पुढे
जात आहे. चीनमधून करोना नष्ट झाला की काय ते सांगता येत नाही. पण चीनमधील
करोनाच्या बातम्या येत नाहीत, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
राज्यांत निवडणुका झाल्या
किंवा होत आहेत. तेथून किमान ५०० पट वेगाने करोनाचा प्रसार देशभरात झाला. त्यामुळे
करोना ही नैसर्गिक आपत्ती मान्य केली तरी या नैसर्गिक आपत्तीचा सूत्रधार राजकीय
मनुष्यप्राणीच आहे. निवडणुका, राजकीय स्वार्थ यासाठी करोनाची
पर्वा न करता दिल्लीश्वरांनी महामारीची लाटच निर्माण केली. देशात प्राणवायूचा
तुटवडा आहे. रेमडेसिवीरची कमतरता आहे. बेडस्, व्हेंटिलेटर्स
कमी पडत आहेत. शववाहिन्या व स्मशानात दाटीवाटी सुरू आहे. एकाच वेळी सामुदायिक चिता
भडकावून करोनाग्रस्त शवांची विल्हेवाट लावली जात असताना मायबाप केंद्र सरकार प.
बंगालात निवडणूक खेळात दंग आहे, असा आरोपही शिवसेनेनं केला
आहे.
' परदेशी लसींना भारतीय बाजारात
येऊ द्या, असे राहुल गांधी सांगत होते तेव्हा गांधी हे
परदेशी लस कंपन्यांचे दलाल असल्याची टीका भाजपचे केंद्रीय मंत्री करीत होते. पण
आता देशाची परिस्थिती हाताबाहेर जाताच परदेशी लसींना भारतात येण्यास मंजुरी दिली.
रशियाच्या करोना प्रतिबंधक 'स्पुटनिक-व्ही' लसीची आयात एप्रिलअखेर सुरू होणार आहे. म्हणजे राहुल गांधी यांचा अभ्यास
आणि अक्कल दिल्लीतील विद्यमान राज्यकर्त्यांपेक्षा उच्च कोटीची आहे. राहुल गांधी
हे करोना लढाईत सरकारपेक्षा शंभर पावले पुढे आहेत, असंही
शिवसेनेनं म्हटलं आहे.
' या संकटाशी सामना करण्याइतकी
इच्छाशक्ती आमच्या केंद्र सरकारकडे आज उरली आहे काय? की
करोना युद्धापेक्षा त्यांना चार राज्यांतील निवडणूक महत्त्वाची वाटत आहे? तामीळनाडू, केरळात तर भाजपचा सुपडा साफ होणारच आहे.
पुद्दुचेरी या लहान केंद्रशासित राज्यात भाजपला फार रस नसावा. त्यामुळे संपूर्ण
केंद्र सरकार राजकीय आखाडय़ात उतरले आहे ते पश्चिम बंगाल जिंकण्यासाठीच. तेथेही ममता बॅनर्जी
संपूर्ण केंद्र सरकारशी एकाकी झुंज देताना दिसत आहे. प्रश्न इतकाच आहे, उद्या पश्चिम बंगाल भाजपने जिंकले तरी देशातील करोनाचे संकट दूर होणार आहे
काय? किंवा प. बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला तर करोनाचे
खापरही ममता बॅनर्जींवर फोडून दिल्लीश्वर काखा झटकणार आहेत काय?,' असा खोचक सवाल शिवसेनेनं केला आहे.
0 टिप्पण्या