Ticker

6/Breaking/ticker-posts

संचारबंदीतही ‘कुंग-फू’ सुरू; कराटे क्लासचालकसह पालकांनाही लगावला पोलिसांनी दंडाचा ‘स्ट्रोक’

 









लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर: संचारबंदीच्या नियमांचा भंग करून पारनेर  येथील महाविद्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या कराटे क्लासवर कारवाई करण्यात आली. क्लासचालक महिलेला दहा हजारांचा दंड करण्यात आला. याशिवाय क्लासमध्ये मुले पाठविणाऱ्या पालकांकडूनही प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गर्दी होत असल्याने तालुक्यातील दवाखाने आणि औषध दुकाने वगळता अन्य अत्यावश्यक सेवाही एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

आज गुरुवारी सकाळपासून तहसिलदार ज्योती देवरे आणि पोलिस निरीक्षक घन:श्याम बळप यांनी ठिकठिकाणी फिरून पाहणी सुरू केली. गर्दी असलेल्या ठिकाणांवर जाऊन कारवाई करण्यात आली. काही खासगी क्लास सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. पारनेर शहरातील महाविद्यालयाच्या आवारात वैशाली बांगर यांचा खासगी कराटे क्लास सुरू असल्याचे आढळून आले. संचारबंदीचा नियम मोडल्याबद्दल त्यांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तेथे प्रशिक्षणासाठी आलेल्या मुलांच्या पालकांनाही दंड करण्यात आला. सर्व मुलांच्या पालकांना प्रत्येकी एक हजार रुपये असा मिळून पंधरा हजार रुपयांचा दंड झाला. काही ठिकाणी विद्यार्थी खासगी क्लासला निघाल्याचे आढळून आले. त्यांना रस्त्यातूनच घरी पाठविण्यात आले. क्लासचालकांना समज देऊन क्लास बंद ठेवण्यास सांगण्यात आले.

बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. भाजी आणि किराणा खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर आले होते. ग्राहक आणि दुकानदार यांच्याकडून नियमांचा भंग केला जात असल्याचे आढळून आले. केवळ शहरच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांत अशीच परिस्थिती असल्याचे आढळून आले. 'ब्रेक दि चेन' अंतर्गत नियम घोषित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक सूचना केल्या आहेत. संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या असल्या तरी गर्दी झाल्यास गरजेनुसार कारवाई आणि निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याचा आधार घेऊन तहसिदार देवरे यांनी तालुक्यातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने गुरुवारी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे पारनेर तालुक्यात आज केवळ दवाखाने आणि औषध दुकाने सुरू राहणार आहेत. भाजी, किराणा, दूध डेअर अशा सूट देण्यात आलेल्या सेवाही आजच्या दिवसासाठी बंद करण्याचा आदेश देण्यात आला. दुकानदार आणि ग्राहकही नियम पाळत नसल्याने गर्दी होत होती, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ठिकठिकाणी कट्यावर, पायऱ्यांवर, पारावर गप्पा मारत बसलेले लोक पाहून अधिकाऱ्यांनी त्यांना समज देत चिंता व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या