लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).
मुंबई: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने शैक्षणिक वर्ष २०२१-२२साठी ३१
ऑगस्ट रोजी पहिली प्रवेश फेरी संपवावी आणि १५ सप्टेबरपासून कॉलेज सुरू करावे असे
वेळापत्रक दिले आहे. मात्र देशातील करोनाची स्थिती लक्षात घेता हे वेळापत्रक पाळणे
राज्यांना अवघड होणार आहे.
करोनामुळे देशात केंद्रीय शिक्षण मंडळासह विविध
राज्यांतील शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा निर्णय जून महिन्यात होणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर राज्यांच्या
इंजिअनीअरिंग प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. यामुळे या सर्व
प्रक्रियेला नक्कीच जुलै उजाडणार आहे. ऑगस्ट महिन्यात सीईटीचा निकाल जाहीर होऊन
प्रवेश प्रक्रिया सुरू करणे अवघड असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे परिषदेने हे
वेळापत्रक बदलावे, अशी मागणी
होत आहे.
बारावी परीक्षांबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर
परिषदेने वेळापत्रक तयार करावे. मागील वर्षीही करोनाची स्थिती लक्षात घेता अनेक
वेळा परिषदेला वेळापत्रक बदलावे लागले होते. यंदा मात्र परिस्थिती अधिकच बिकट आहे.
यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पहिली फेरी, ९ सप्टेंबरपर्यंत दुसरी फेरी संपवून १५ सप्टेंबरपर्यंत कॉलेज सुरू होणे
अघड आहे. यामुळे परिषदेने वेळापत्रक मागे घेऊन शिक्षण व्यवस्थेवरील ताण कमी करावा
तसेच सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
0 टिप्पण्या