लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
राहुरी :- येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या अपहरण व खून
प्रकरणातील फरारी आरोपी अक्षय कुलथे याला उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून
अटक करण्यात आली. आरोपी तेथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरच्या पोलीस पथकाने
त्याला अटक केली. स्थानिक न्यायालयातून त्याची प्रवासी कोठडी घेण्यात आली असून,
त्याला राहुरीला आणण्यात येत आहे.
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे संपादक व
माहितीचा अधिकार क्षेत्रात काम करणारे दातीर यांचे ६ एप्रिलला अपहरण झाले होते.
त्यानंतर काही तसांताच त्यांचा मृतदेह आढळून आला. एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून
आलेल्या आरोपींनी दातीर यांना बळजबरीने कारमध्ये बसवून नेल्याची माहिती पोलिसांना
मिळाली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण
आणि खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस
निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी व तोफिक
मुक्तार शेख या दोन आरोपींना अटक केली होती.
मधल्या काळात या प्रकरणाला राजकीय वळण
लागले. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस
अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके
यांच्याकडे सोपवला. यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे फरारी होता. मिटके
यांनी तपासाची चक्रे फिरवून मोरे याची माहिती मिळविली. तो नेवासा फाटा येथील एका
हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुख्य आरोपी कान्हू
गंगाराम मोरे याला नेवासा फाटा येथील हॉटेलातून अटक करण्यात आली.
या गुन्ह्यातील आणखी एक महत्वाचा आरोपी
अक्षय कुलथे हा फरार होता. मिटके यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले. तो उत्तर
प्रदेशातील चटिया, (ता.
बीनंदनकी, जि. फतेहपूर) येथे लपून बसल्याची माहिती मिळाली.
मिटके यांनी तेथे पोलीस पथक पाठवून आरोपी कुलथे याला अटक केली. त्याला फतेहपूर
येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याची प्रवासी कोठडी घेण्यात आली. पोलीस
पथक त्याला घेऊन राहुरीकडे निघाले आहे. कुलथे याच्याविरुद्ध राहुरी, राहाता, कोपरगाव अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दातीर
यांच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याची महत्वाची भूमिका असल्याचा संशय आहे. आतापर्यंत
सर्व आरोपींना अटक झाल्याने दातीर यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा होणार
आहे.
0 टिप्पण्या