लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जळगाव:- जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर बीओटी अंतर्गत बांधण्यात
आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात मोठा घोटाळा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला असल्याचा गंभीर आरोप गेल्या आठवड्यातच ॲड. विजय
भास्कर पाटील यांनी केला होता. या प्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती गुरुवारी
जळगाव जिल्हा परिषदेत दाखल झाली. समितीने पहिल्याच दिवशी या संदर्भातील
कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे )
जळगाव जिल्हा परिषदेला सात कोटी रुपये भरून
जामनेरच्या मार्केट परिसरातील जागेच्या विकासाचा हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधून ही दुकाने विक्री करण्यात आली. यात २०० कोटी
रुपयांचा गैरव्यवहार गिरीश महाजन यांनी खटोड बंधूंच्या माध्यमातून केला असल्याचा
आरोप ॲड. विजय पाटील यांनी केला होता. याच इमारतीत असलेल्या हॉस्पिटलचे उद्घाटन
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फड्णवीस यांच्या हस्ते झाल्यामुळे त्यांचा देखील या
गैर व्यवहारात सहभाग असावा अशी शक्यताही अॅड. पाटील यांनी आरोप करताना व्यक्त केली
होती. या तक्रारीवरून शासनाने चौकशीसाठी समिती नेमली आहे.
जामनेर शॉपिंग कॉम्प्लेक्स घोटाळ्या
प्रकरणी चौकशी समितीचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त सतिश सांगळे, तसेच राजन पाटील, सहाय्यक
लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे या तीन अधिकाऱ्यांची समिती गुरुवारी दुपारी १
वाजता जळगाव जिल्हा परिषदेत दाखल झाली. या तीन सदस्यांच्या समितीने व्हीसी
रूममध्ये बसून जामनेरच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स बाबत झालेले ठराव, संबधित मंजुरीबाबतची कागदपत्रे, जागेचे नकाशे,
मूळ नस्ती यासह सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली. बांधकाम
विभागाकडून समितीने विविध कागदपत्रांची मागणी केली असता त्याची पूर्तता देखील
करण्यात आली. यावेळी बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता नंदू पवार, सामान्य प्रशासनचे कमलाकर रणदिवे हे देखील समिती सोबत होते. सायंकाळी ६
वाजेपर्यंत समिती तिथे होती.
चौकशीसाठी
आलेल्या समितीचे अध्यक्ष सतिश सांगळे यांच्यासह सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना
सांगितले की, समितीने आजपासून चौकशीच्या
कामाला सुरुवात केली आहे. राज्यातील बीओटी तत्वावरील हा पहिलाच प्रकल्प होता. आधी
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली जात असून मुख्य बाबी तपासल्या जात आहेत.
शुक्रवारी देखील समिती जळगावात थांबणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करणार आहे. या
प्रकरणाची व्याप्ती किती आहे, हे तपासले जाईल. त्यानंतर
आगामी आठवड्यात देखील समिती जळगावात येईल, असे त्यांनी
सांगितले.
जामनेरला जावून
वादग्रस्त कॉम्प्लेक्सला भेट देणार?
प्राथमिक चौकशीत कागदपत्रांची पडताळणी
पूर्ण केल्यानंतर समितीकडून पुढील आठवड्यात जामनेर येथे प्रत्यक्ष शॉपिंग
कॉम्प्लेक्सला भेट दिली जाणार असल्याचे समजते. मात्र याबाबत समिती अध्यक्षांनी
अजून तरी तसे सांगता येणार नाही. सगळ्याच बाबी तपासल्या जातील असे स्पष्ट केले.
0 टिप्पण्या