Ticker

6/Breaking/ticker-posts

सध्याचा काळ चॅलेंजिंग, राजकीय हस्तक्षेप होणार नाही; गृहमंत्री वळसे-पाटील

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रिपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, असं सांगतानाच प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले. मी आजच पदभार स्वीकारला आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचं काम मी करेल. सध्याचा काळ अवघड आणि चॅलेंजिंग आहे. कोरोनामुळे पोलीस फोर्स रस्त्यावर आहेत. फिल्डवर काम करत आहे. पोलीस दलाचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आहे. तरीही कोरोनामुळे त्यांना ही ड्युटी करावी लागत आहे. त्यातच आता एप्रिलमध्ये गुडीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजानची सुरुवात आदी विविध सण-उत्सव आहेत. प्रत्येक धर्मीयांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.

निष्ठ तपासणार

पोलीस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असल्याचं वळसे-पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर कुणाच्या निष्ठा काय आहेत, हे तपासण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

काल उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो निर्णय दिला आहे. त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच कोर्टाने जो आदेश दिला आहे, त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू, असंही ते म्हणाले.

म्हणून फडणवीसांना माहिती मिळते

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीस दलातील माहिती का मिळते? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तसेच गृहखात्याचा पदभार त्यांच्याकडे पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांना माहिती मिळते. त्यावरही लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बदल्या नियमानुसारच

महिला आणि सामान्य नागरिकांना गृहविभागाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार आहे. त्याकरिता आजीमाजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलीस दलाचं सक्षमीकरण करण्यात येईल. स्वच्छ प्रशासन देण्यावर भर असेल. तसेच प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही. बदल्याच्या संदर्भात प्रत्येक विभागाची जी पद्धत ठरली आहे, वेगवेगळ्या स्तरावर जे अधिकार दिले आहेत. त्यानुसार काम करू, शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलिसांना घरं देणं या सर्व गोष्टींवर लक्ष देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्वतंत्र व्यवस्था निर्माण करू

कोण काय आरोप करत आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझा पारदर्शक कारभार करण्यावर भर असेल, असं सांगतानाच दैनंदिन दिवसांमध्ये छोटे-मोठे गुन्हे होत असतात. हे गुन्हे निपटून काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं


जयंत पाटील यांनी तरुणपणीच्या काही आठवणींना दिला उजाळा..

राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या काही नेत्यांकडे पाहून आपल्याला त्यांचा कधीकधी हेवा वाटतो. त्यांचा थाटमाट, त्यांच्यात असलेली समाजाभीमूखता आपल्याला हवीहवीशी वाटते. मात्र, याच नेत्यांचा त्यांच्या तरुणपणीचा संघर्ष अनेकांना माहिती नसतो. या नेत्यांनी त्यांच्या तरुणपणी केलेल्या संघर्षाची जाणीव आपल्याला नसते. सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गृहमंत्रिपदाचा पदभार राष्ट्रवादीचे नेते  यांनी नुकताच स्वीकारला आहे. याचेच औचित्य साधून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तरुणपणीच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांसोबतचा त्यांचा ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कडक शिस्तीचे प्रशासक

दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहे. जयंत पाटील यांनीसुद्धा आपला जुना काळ आठवत वळसे पाटील यांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले आहे. त्यांनी वळसे पाटील यांना कडक शिस्तीचा प्रशासक म्हटलं आहे. माझे जुने मित्र दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता गृहमंत्रिपदाच्या जबाबदारीसाठीही मनापासून शुभेच्छा,” असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या