Ticker

6/Breaking/ticker-posts

इच्छाशक्तीची कमाल ! ९० वर्षांवरील दोन हजार नागरिकांनी 'अशी' केली करोनावर मात

 








लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).

मुंबई: मुंबईत करोनाने दहशत पसरवली असतानाच अनेकांनी करोनावर यशस्वी मात केल्याची उदाहरणे आहेत. त्यात नव्वदी पार केलेल्या दोन हजार ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या सर्वांनी अतुलनीय जिद्द दाखवून या आजारावर मात केली आहे.

 करोनाचा संसर्ग हा ज्येष्ठ, सहव्याधी असलेल्यांना अधिक प्रमाणात जाणवतो. त्या पार्श्वभूमीवर शहरातील ९० आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या २,२७७ ज्येष्ठ नागरिकांना करोनाने ग्रासले. त्यापैकी २०० ज्येष्ठ नागरिकांचा करोनाविरोधातील लढाईत मृत्यू ओढवला. असे असले तरी उर्वरित २,०७७ जणांनी करोनावर मात केली आहे. फेब्रुवारीपासून मुंबईत करोनाने रुग्ण वाढत गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत गेला. गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्या कमी होत असताना नव्वदीपार असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील करोनाविरोधातील लढाई जिंकत असल्याचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. पालिकेकडील नोंदीनुसार ९० वर्षे वयोगटातील करोना झालेल्यामध्ये ४७ टक्के महिला आणि ५३ टक्के पुरुषांचा समावेश आहे. पालिकेने हाती घेतलेल्या सर्वेक्षण आणि तपासणी मोहिमेचा फायदा झाल्याचे आढळून आले आहे. ऑक्सिजन पातळी कमी होण्यासह सहव्याधी असलेल्यांवर लगेचच उपाय केले जात आहेत. तसेच, पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना तातडीने जम्बो केंद्र, करोना केंद्रात खाटा उपलब्ध केल्या जात आहेत.

विशेष काळजी

ज्येष्ठ नागरिकांना उपचार घेत असताना एकटेपणा जाणवू नये म्हणून डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून लक्ष पुरविले जात आहे. उपचार कालावधीत रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा व्हिडीओ कॉलच्या साहाय्याने संवाद साधला जावा, हेदेखील पाहिले जात आहे. औषधोपचार, काळजी, जिद्द आदींमुळे ज्येष्ठ नागरिकांना करोनावर मात करण्यास बळ मिळत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या