Ticker

6/Breaking/ticker-posts

‘हम साथ साथ है !’ मुश्रीफ-विखे पाट्लांच्या शिर्डीतील बैठकीत झाला मोठा निर्णय

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील  यांनी करोना परिस्थितीत हातात हात घालून काम करायचे ठरविले आहे. विखेंचा मतदारसंघ असलेल्या शिर्डीत जिल्ह्याच्या सहा तालुक्यांसाठीचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णयही झाला आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनीच पत्रकारांना दिली. त्यापूर्वी त्यांनी शिर्डीत जाऊन विखे यांच्यासोबत बैठक घेतली. असे असले तरी शिर्डीत अन्य तालुक्यांतील रुग्ण ठेवण्यास स्थानिकांचा विरोध कायम आहे. पालकमंत्री मुश्रीफ शनिवारी नगरला आले होते. त्यांनी शिर्डी, कोपरगाव व नगरला बैठका घेतल्या. पालकमंत्री नगरला येत नाहीत, म्हणून विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात आणि जातात, असा आरोप विखेंनी केला होता. शिर्डीत कोविड केअर सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, त्याला विखे समर्थक आणि स्थानिक नागरिकांचा विरोध होता. शिर्डीत बाहेरच्या तालुक्यांचे रुग्ण आणू नयेत, अशी त्यांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी शिर्डीत बैठक घेतली. अगदी काही मिनिटांतच त्यांनी विखे आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यानंतर नगरमध्ये पत्रकारांना माहिती देताना मुश्रीफ यांनी सांगितले की, विखेंसोबत आमची बैठक झाली आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. करोना परिस्थितीशी लढताना आम्ही हातात हात घालून काम करणार आहोत. शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलआणि साईनाथ रुग्णालयात नगरच्या उत्तर भागातील सहा तालुक्यांसाठीचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर शहरातील जिल्हा रुग्णालयावर येणारा ताण कमी होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.


विखे यांनीही ट्वीट करून पालकमंत्र्यांसोबत बैठक झाल्याचे सांगून विविध समस्यांवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. त्यावर उपाय करण्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचेही विखे यांनी नमूद केले आहे. मात्र, आपण विरोधावर ठाम असल्याचे शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, हे कोविड सेंटर शिर्डी आणि परिसरातील रुग्णांसाठी असावे. बाकीच्या तालुक्यातील रुग्ण येथे आणले जाऊ नयेत. त्यामुळे येथील यंत्रणेवर ताण येईल. प्रत्येक तालुक्यात मोठ्या संस्था आहेत. त्या त्या आमदारांनी आपल्या तालुक्यात कोविड सेंटर उभारावीत, म्हणजे कोणावरच ताण येणार नाही. पालकमंत्र्यांच्या बैठकीचे आपल्याला निमंत्रणच नव्हते, असे गोंदकर म्हणाले.

शिर्डीत कोविड केअर सेंटर होण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी तेथे जाऊन पाहणी केली होती. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना यासंबंधी सूचना केल्या होत्या. तेव्हापासूनच येथे बाहेरच्या तालुक्यातील रुग्ण आणण्यास शिर्डीकरांनी विरोध केला आहे. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचेही या कोविड सेंटरवर लक्ष असून तेथे बाहेरचे रुग्ण नकोत, अशी त्यांचीही भूमिका असल्याचे सांगण्यात आले.

नगरला १४ दिवस जनता कर्फ्यू

मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. करोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हावासियांनी १४ दिवस कडक जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहनही मंत्र्यांनी केले. रेमडिसीवीर, ऑक्सिजन पुरवठा यासंबंधी त्यांनी आढावा घेतला. सलून चालक आणि डबेवाले यांच्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या