राज्यातील व्यापार्यांच्या संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन
नगर - लक्ष्मी रोडवरील गणपती चौक व्यापारी संघटना, पुणे यांच्या वतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गणपती चौकातील श्रीराम कृपा घोडके यांच्या हॉलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शिबिर संपन्न झाले
या शिबिराचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. संघटनेच्या सभासद व्यापार्यांनी, तसेच त्यांच्या कामगारांनी यावेळी रक्तदान केले. शिबिराच्या माध्यमातून एकूण 54 पिशव्या रक्त संकलित झाले. शहर व जिल्हा स्तरावर कार्यरत असणार्या राज्यातील व्यापार्यांच्या विविध संघटनांनी रक्ताची वाढती गरज लक्षात घेत पुढाकार घेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष संजय मुनोत म्हणाले की, कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतसुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकीय कर्मचारी रुग्णांची सेवा करून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. सध्या याच रुग्णांना उपचारासाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. काही बंधनांमुळे, तसेच भीतीमुळे आपण या कोरोना रुग्णांना प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन मदत करू शकत नाही. परंतु सामाजिक जबाबदारीचे भान राखत व्यापार्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले, असे ते म्हणाले.
यावेळी हेमंत रासने, प्रवीण परदेशी, तसेच संघटनेचे संजय मुनोत, नीतेश चोपडा, सुमीत खंडेलवाल, सचिन फिरोदिया, अमित मुनोत, नयन ठाकूर, प्रशांत उपस्थित होते .
0 टिप्पण्या