Ticker

6/Breaking/ticker-posts

संतापजनक: ‘बीडमधील 22 मृतदेहांची अवहेलना’, पंकजा मुंडेंकडून नाव न घेता धनंजय मुंडेंवरही निशाणा

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

बीड : बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर चक्क 22 मृतदेह कोंबून भरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. कारण त्यांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिलीय ते त्यांचे योग्य कर्तव्य बजावत नाहीयत, अशा शब्दात पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

“ 22 लोकांचा मृतदेह सामाना प्रमाणे कोंबून भरून अंत्यविधीसाठी पाठवण्यात आला. ही एक भयानक घटना अजून कुठली नसून माझ्या बीड जिल्ह्याची आहे. या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करावं की संताप व्यक्त करावं हे मला कळत नाही. बीड जिल्ह्यामध्ये सरकारने अत्याचार करायचं ठरवलं आहे. प्रशासनाने हात टेकले आहेत. ही परिस्थिती बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आताच्या वर्तमान कोरोना परिस्थितीसाठी अतिशय भयानक आहे”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मनस्ताप व्यक्त केला.

राजकारण करण्याची माझी भूमिका कधीच नव्हती. कधीही मी भूमिका घेत असताना बोल्ड भूमिका घेतली आहे. कारण ती जनतेच्या हिताची आहे. कदाचित स्वतःचं नुकसान केलं असेल, पण मी माझी भूमिका प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडल्या आहेत. आज बीड जिल्ह्यामध्ये जे चाललंय ते पाहून माझी हात जोडून विनंती आहे. मुख्यमंत्री महोदयांना आदरणीय शरद पवार साहेबांना, अजित पवारांना मी विनंती करते, आपण बीड जिल्ह्याकडे कृपया जातीने लक्ष द्यावे. आपण शासनाची जबाबदारी ज्यांच्यावर दिली ते स्वतःचे कर्तव्य बजावत नाहीत हे दर वेळेस स्पष्ट झाले आहे”, अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

लोकांना पाया पडल्याशिवाय रेमडेसिविर मिळत नाही. डॉक्टर दहशतीमुळे बोलत नाहीत. परळीच्या डॉक्टरला कोविड झाला आहे आणि त्याला स्वतःला रेमडेसिवीर मिळत नाहीय. तो स्वतः चार डॉक्टरांना विचारत आहे. बीडच्या मृतांच्या प्रकरणात चौकशीमध्ये काहीच समोर येणार नाही. कारण चौकशीमध्ये सर्व इकडेतिकडे करण्याची प्रथा आहे”, असं पंकजा म्हणाल्या.

अजित दादांची प्रतिक्रिया ऐकली की, रेमडीसीविर कुणाच्या हातून किंवा कुणाच्या खिशातून वाटणे चुकीचे आहे. आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये आपण ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते निष्काळजीपणे काम करत असल्यामुळे आज माझ्या बीड जिल्ह्याच्या लोकांची हेळसांड होत आहे. याच गोष्टीची आपण चौकशी करावी. जातीने लक्ष घालावे. आपण जी स्पष्ट भूमिका मांडली आहे आणि आपण ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे ते विपरीत वागत असतील तर चौकशी झाली पाहिजे. रेमडेसिविर जर कुणाच्या हातून जात असेल आणि ते मिळायला वेळ लागत असेल आणि कुणाचा जीव जात असेल तर याला जबाबदार कोण? हा माझा प्रश्न आहे”, असंदेखील त्या म्हणाल्या.

बीडचं नेमकं प्रकरण काय?

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्याने मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे.

रुग्णालयाकडे दोन रुग्णवाहिका

रुग्णालयात केवळ दोनच रुग्णवाहिका आहेत. कोरोनाचं वाढतं संकट पाहता पाच अतिरिक्त रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. 17  मार्च 2021 रोजी जिल्हा प्रशासनाला चिठ्ठी लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजून कोणताही रुग्णवाहिका मिळालेली नाही, असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. रुग्णावाहिका नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असून स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या