लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर : केंद्र सरकारने दि. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना करोना लसीकरणाची परवानगी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही लसीकरण मोहिम गतिमान होणार आहे. त्यादृष्टीने नगर शहरात महानगरपालिकेने आपल्या हद्दीत लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज आहे. यासाठी आताच नियोजन करावे, अशी मागणी नगरसेविका मीनाताई चोपडा यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी आ.संग्राम जगताप तसेच मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नगरसेविका चोपडा यांनी म्हटले आहे की, नगर शहरात महानगरपालिका व शासनाच्यावतीने कोविड 19 लसीकरण करण्यात येत आहे. जिजामाता रूग्णालया भोसले आखाडा, केडगाव, प्रोफेसर कॉलनी, आयुर्वेद कॉलेज, मुकुंदनगर या परिसरात लसीकरणाची व्यवस्था असून याठिकाणी आताच 45 वर्षांपुढील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्र कमी असल्याने अनेकांना बराच वेळ उभे राहूनही लस संपल्यावर घरी परतावे लागते.
आता 1 मे पासून 18 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरु झाल्यावर या केंद्रांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरात काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु होते परंतु, आता ते बंद झाले आहे. अशावेळी एक मेपासून लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी व गोंधळाची परिस्थिती निर्माण होवू शकते. ही बाब लक्षात घेवून मनपा हद्दीत लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे. त्यामुळे नागरिकांना आपापल्या जवळच्या भागातच सहज लस उपलब्ध होईल.
0 टिप्पण्या