लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आपण
सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग
रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न
पाळल्याने संसर्ग वेगाने वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व
उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे
मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी
नमूद केले
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या ४ महिन्यांत सर्व
काही व्यवस्थित चाललं होतं. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू
काही करोना गेला असे समजून सर्व व्यवहार मोकळेपणाने
सुरु झाले होते. मात्र, अचानक सर्वत्र संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक
स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे
आरोग्याचे नियम पाळावे लागतील.
पुढच्या काळात देखील आपल्याला कोरोना बरोबरच जगायचे असून जीवनपद्धती
त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान
ठेवावे असेही ते म्हणाले. मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर
संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले,
सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे
गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम
फैलाव होत आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या
स्थितीवर बोट ठेवले.
मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही
कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव आला
असल्याचे त्यांनी आपणास सांगितले. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व
जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत
होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण
सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पाहा.
सर्वजण नियम धुडकावत आहेत असे नाही, पण काही नियम न
पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे
आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी
सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे
कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असा इशाराच
मुख्यमंत्र्यांनी दिला.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले. यावेळी मुख्य सचिव सितराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.
0 टिप्पण्या