लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगांव : - शेवगव -पाथर्डी तालुक्यामध्ये दि.२० रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह गारीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज दि (२१) रोजी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासनाने तात्काळ पंंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली .
यावेळी शंकरराव काटे, अर्जुन काटे, भानुदास पालवे, सदाशिव विघ्ने, ज्ञानेश्वर गोर्डे, अशोक काकडे, महादेव डोंगरे, रामनाथ काटे, विठ्ठल मराठे, नितीन पायघन, मोहनराव कातकडे, सुरेश पायघन, प्रकाश वैरागळ, भाऊराव शिंदाडे, एकनाथ पायघन, बापूसाहेब पायघन, भाऊसाहेब मराठे अमोल निकम आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव काकडे म्हणाले की, दि.२० रोजीच्या अवकाळी वादळ वाऱ्यासह गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये मका, गहू, हरभरा, कांदे, बाजरी यासह पपई, पेरू, आंबा आदी फळबागांचाही समावेश आहे. सध्या सर्वत्र मका, गहू, हरभरा, बाजरी काढणीला आले होते.
परंतु काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. पंचनामे करताना मंडलानुसार नुकसान भरपाई हा निकष बाजूला ठेवून प्रत्यक्ष गटानुसार पाहणी करून नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणीही यावेळी अॅड. शिवाजीराव काकडे यांनी केली.
पिकांची मुलाप्रमाणे काळजी घेऊन वाढवले होते
बँकेकडून अथवा पाहुण्या रावळ्यांकडून पैसे घेऊन बियाणे, पेरणी, लागवड, खते आदी वर मोठ्या प्रमाणात खर्च करून पिकांची मुलाप्रमाणे काळजी घेऊन वाढवले होते आणि आता झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ( बापूसाहेब पायघन : नुकसानग्रस्त शेतकरी)
शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
मागील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे अजूनही काही भागात नुकसान भरपाई मिळाली नाही आणि अशातच काल झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले पीक शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.- ( संजय आंधळे, उपाध्यक्ष जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डी)
0 टिप्पण्या