लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई:- 'अँटेलिया'बाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेननंतर झालेल्या बदल्यांमुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये
नाराजीचा सूर आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये बदली केलेले महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त करून ते सुट्टीवर गेले
आहेत. तर, नवे पोलिस
आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांच्या नावाची घोषणा होताच, त्यांना
पदभार देण्याआधीच परमबीर सिंग पोलिस मुख्यालयातून निघून गेले. दुसरीकडे सर्वांत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी
आणि राज्याच्या महासंचालकपदाची जबाबदारी असताना, नगराळे
यांना एका शहराचे आयुक्तपद देण्यात आल्याने आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये कुजबुज आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण
मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणात निलंबित सहायक पोलिस निरीक्षक
सचिन वाझे यांचा सहभाग समोर आल्याने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांचे नाव यामुळे
खराब झाल्याने, तसेच विरोधी
पक्षाच्या दबावामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिस दलामध्ये बुधवारी मोठे फेरबदल
केले. मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार
असलेल्या हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. परमबीर सिंग यांच्याकडे
गृहरक्षक, तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र सुरक्षा
दलाची जबाबदारी देण्यात आली. भारतीय पोलिस सेवेच्या १९८६ बॅचचे पोलिस अधिकारी संजय
पांडे हे सेवाज्येष्ठतेनुसार अग्रस्थानी असूनही राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा
तात्पुरता कार्यभार रजनीश सेठ यांच्याकडे देण्यात आला. आपल्या नंतरच्या
अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिली जात असताना, आपल्याला मात्र
डावलले जात असल्याचा आरोप करून संजय पांडे यांनी आधी संदेश आणि नंतर पत्र पाठवून
मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. ' काही संवेदनशील
प्रकरणाचा तपास माझ्याकडे देण्यात आला. यात केलेल्या तपासावर सरकारनेही शाबासकी
दिली. असे असतानाही नेहमीच 'साइड पोस्टिंग' दिली जात आहे,' असा आरोप करून संजय पांडे सुट्टीवर
गेले आहेत.
आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही कुजबुज
मुंबई पोलिसांची बदनामी झाली असली, तरी यात परमबीर यांचा अद्याप कोणताच सहभाग समोर आला नव्हता. असे असताना
तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे समजताच बुधवारी परमबीर सिंग हे हेमंत नगराळे
येण्याआधीच पोलिस आयुक्तालयातून निघून गेले. परंपरेनुसार नवीन अधिकाऱ्याकडे पदभार
देण्यात येतो. मात्र, सहभाग समोर येण्यापूर्वीच करण्यात
आलेली बदली आणि प्रसारमाध्यमांना चुकविण्यासाठी परमबीर सिंग निघून गेले. आयपीएस
अधिकाऱ्यांच्या गोटामध्येही या बदल्यांची चर्चा असून, काहींचे
आदेशाच्या बाजूने; तर काहींचे बदल्या योग्य प्रकारे केल्या
नसल्याचे मत आहे.
0 टिप्पण्या