राजभाषा मराठी व्याख्यानमालेचा समारोप
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर :-अन्न, वस्त्र, निवारा आणि वाचन ह्याच मूलभूत चार गरजा जगाच्या अंतापर्यंत राहणार आहेत.जर तसे झाले नाही तर माणसाचा पशू होण्यास वेळ लागणार नाही. आणि असे झाले तर पशूला माणसाळवण्यासाठी पुन्हा माणसाला वाचनाची गरज पडेलच. म्हणून समाज आणि विश्व यातील घडामोडी वाचण्यासाठी माणसाला पुस्तकाचे डोळे येणे आवश्यक आहे.पुस्तकांच्या डोळ्यांनी जग पाहता व वाचता आले पाहिजे, असे प्रतिपादन उपजिल्हानिवडणूक अधिकारी श्री जितेंद्र पाटील यांनी केले.
ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या माध्यमातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी राजभाषा गौरव ऑनलाइन व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प गुंफताना श्री पाटील बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालयअधिकारी श्री अशोक गाडेकर उपस्थित होते. ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
श्री.गाडेकर यांनी नमूद केले की व्याख्यानमालेच्या माध्यमातून मन, माणूस आणि विचारांची मिती घडवण्याचा कार्यालयाचा मानस आहे. यातून पुस्तकांची देवाण-घेवाण व पर्यायाने विचारांची देवाण-घेवाण व पर्यायाने माणूसपणाची देवाण-घेवाण निश्चितच होण्यास मदत होणार आहे. संपूर्ण भारतामध्ये लाखो ग्रंथालयांमधील कोट्यावधी पुस्तके यंत्र झालेल्या माणसांची वाट पाहत आहेत. स्वतःच्या शरीरातील मन, हृदय सजीव करण्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांचे औषध घेणे जरुरी आहे.
मुलाखत वजा व्याख्यानातून श्री पाटील यांनी वाचनाची गोडी ,वाचनाची तयारी, लक्षात राहिलेली पुस्तके, विविध भाषांमधील पुस्तके ,आवडते पुस्तक- लेखक -लेखिका कवी- कवयित्री तसेच वाचन छंद वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, वाचनातून स्वत:च्या जीवनामध्ये झालेला बदल,वाचनाव्यतिरिक्त इतर छंद, पुस्तकांवर चर्चा अथवा टिपणे, वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी राबवलेले उपक्रम ,नव्या युवापिढीला वाचन क्षेत्रात येण्यासाठी दिलेला संदेश आदीं मुद्द्यांच्या माध्यमातून श्री पाटील यांनी विविध रंजक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली .
राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक डॉ अमोल बागुल यांनी मुलाखत घेतली. तांत्रिक निरीक्षक श्री रामदास शिंदे यांनी आभार मानले. विविध समाज माध्यमांवर असंख्य रसिक प्रेक्षकांनी या मुलाखतीचा आस्वाद घेतला.
0 टिप्पण्या