Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमध्ये भरदिवसा थरार; हप्ता वसुलीसाठी गुंडांची दुकानदाराना मारहाण..!

बालिकाश्रम रोडवरील  २ दुकानदाराना  गुंडांच्या टोळीने  मारहाण करीत लुट्ले


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : आम्ही या भागातील डॉन आहोत. दुकान चालवायचे असेल तर आम्हाला हप्ता द्या,’ असे म्हणत गुडांच्या एका टोळक्याने बालिकाश्रम रोडवरील दोघा दुकानदारांना मारहाण केली. त्यांच्याकडील पैसेही हिसकावून नेले. यासंबंधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कापड दुकानदाराला आणि सायकलीचे दुकान चालविणाऱ्याला या टोळीने लुटल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

नगर शहरातील बालिकाश्रम रोड या गजबजलेल्या भागात शनिवारी भरदिवसा हा प्रकार घडला. अक्षय राजेंद्र जाधव यांनी यासंबंधी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांचे कापड दुकान आहे. दुपारच्या सुमारास ते दुकानात असताना एका कारमधून आलेल्या गुडांनी त्यांना धमकावले. दुकानात प्रेम विठ्ठल नन्नावरे, मुकुंद कांबळे होते. त्यांना दमदाटी केली. आम्ही या भागातील डॉन आहोत, हप्ता द्यावाच लागेल, असे म्हणून दंडुक्याने मारहाण केली. काउंटरमधील तीन हजार पाचशे रुपये आणि मोबाइल हिसकावून गुंड निघून गेले. दुकानातील कामगारांनाही त्यांनी मारहाण केली. त्यानंतर हे गुंड शेजारील सायकल दुकानात गेले. तेथे दुकानदार प्रवीण ठकसेन साळवे यांनाही धमकावले. त्यांच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. त्यांनाही लाकडी दांडक्यांने मारहाण केली. त्यानंतर गुंड निघून गेले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे पथकासह तेथे दाखल झाले. अक्षय जाधव यांनी यासंबंधी फिर्याद दिली. त्यानुसार जवळच्या सिद्धार्थनगर भागात राहणारे विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, सुरज साठे, राहूल झेंडे, मयूर चावरे, अक्षय (पूर्ण नाव कळाले नाही) यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार समाधान सोळंके यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे आधीच व्यावसायावर अनेक बंधने आली आहेत. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत. विविध सार्वजनिक उत्सवांच्यावेळी दुकानदारांना सक्तीच्या वर्गणी वसुलीला सामोरे जावे लागते. करोनामुळे उत्सव बंद आहेत. मात्र, हप्त्यांसाठी गुंडांच्या टोळ्यांचा उपद्रव सुरूच आहे. गजबजलेल्या भागातील दुकानात भरदिवसा घुसून लुटमार करण्यापर्यंत गुंडाची मजल गेल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या