Ticker

6/Breaking/ticker-posts

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांबाबत शरद पवारांचं भाकित

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: 'आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल', असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी पाच राज्यातील निवडणुकांवर फार मोठे विधान केले आहे. पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे परंतु लोक निर्णय घेत असतात. त्या राज्यांची स्थिती मला माहीत आहे. त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही, असं शरद पवार म्हणाले.


तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्या बाजूने आहे. ते राज्याची सूत्रे हातात घेतील. लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील, असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांची बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

' आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल,' असा अंदाज पवारांनी वर्तवला.

राज्यपालांनी 'तो' चमत्कार करून दाखवलाय

पवार म्हणाले, 'राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्या आहेत. हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनाही तत्कालिन राज्यपालांनी अशाप्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातही राज्यपाल याच पद्धतीने राज्य सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, ही बाब चिंताजनक आहे. शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस उलटूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका न घेतल्यामुळे संसदेचे कामकाज बंद पडले. या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तसेच संसद अस्वस्थ आहे. याबाबतची प्रतिक्रिया सोमवारच्या कामकाजात नक्की उमटेल अशी आशा आहे. कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र, राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल, असा विश्वास आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या