Ticker

6/Breaking/ticker-posts

वीज ठेकेदाराची मुजोरी ; ठाकूर निमगावला उभ्या ऊसाचे प्रचंड नुकसान

 संतप्त शेतकऱ्यांनी टॉवर लाईनचे काम बंद पाडले

    


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 शेवगाव ( जगन्नाथ गोसावी) : - वीज प्रशासन व ठेकेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता वीज उपकेंद्राच्या कामासाठी टॉवर उभारणी व वीज वाहक तारा टाकण्याचे काम सुरू केल्याने ठाकूर निमगाव (ता.शेवगाव) येथे शेतकऱ्यांच्या उभ्या ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दिं.११) हे काम बंद पाडले तसेच नुकसान भरपाई मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा गर्भित इशाराही दिला. याबाबत शेतकऱ्यांनी आ.मोनिका राजळे यांचेही लक्ष वेधले. दरम्यान, याप्रश्नी शुक्रवारी (दिं.१२) ठाकूर निमगावला बैठक होत असल्याचे युवा कार्यकर्ते संभाजी कातकडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब कातकडे यांनी सांगितले.




          अमरापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २२०/१३२ केव्हीए वीज उपकेंद्रासाठी औरंगाबाद नजीकच्या ताप्ती तांडा येथील ४०० केव्हीए या उच्च दाबाच्या वीज केंद्रातून वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अमरापूरचे वीज उपकेंद्र हे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आहे. सध्या या कामासाठी ठाकूर निमगाव (ता. शेवगाव) येथे टॉवर उभारणी व वीजवाहक तारा ओढण्याचे काम एका नामांकित खासगी कंपनीमार्फत  सुरू आहे.

     वास्तविक, हे काम सुरू करण्याआधी वीज प्रशासन व संबंधित कंपनीने ज्या त्या गावच्या शेतकऱ्यांना काम व नुकसान भरपाई संदर्भात कल्पना देणे गरजेचे होते. मात्र, ठाकूर निमगावच्या शेतकऱ्यांना ही माहिती दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या ऊस पिकाचे नुकसान झाल्याने ते संतप्त झाले व त्यांनी हे काम नानासाहेब कातकडे, संभाजी कातकडे, मच्छिंद्र कातकडे, जालिंदर निजवे, बबन खंडागळे आदी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली बंद पाडले.

          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या