लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ.नगर: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ
स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर मुंबई क्राइम ब्रन्च
मधील अधिकारी सचिन
वाझे हे टीका आणि आरोपांच्या
केंद्रस्थानी आहेत. त्याचवेळी वाझे यांच्याशी संबंधित असलेल्या ख्वाजा युनूस प्रकरणाचीही पुन्हा एकदा आठवण झाली आहे. नगर जिल्ह्यात पोलीस गाडीला अपघात
झाल्यावर तेथून युनूस बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. हे प्रकरण अद्याप
न्यायप्रविष्ट आहे. मात्र हे नेमके काय प्रकरण आहे ते जाणून घेऊ या...
मुंबईतील घाटकोपर येथील बॉम्ब स्फोट
प्रकरणात २५ डिसेंबर २००२ रोजी ख्वाजा युनूस याला अटक झाली होती. तो मूळचा परभणी
जिल्ह्यातील. अटकेनंतर त्याची चौकशी सुरू होती. त्याला चौकशीसाठी औरंगबादला नेले
जात असताना नगर-पुणे महामागार्वर पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात पोलिसांच्या
गाडीला अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये पोलिसांना किरकोळ
दुखापत झाली. मात्र, यावेळी
ख्वाजा बेडीसह पळून गेला, असे पोलीस सांगतात. पोलिसांनी
यासंबंधी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आणि नगरच्या सरकारी रुग्णालयात
येऊन उपचार घेतले.
बेडीसह पळालेल्या ख्वाजासाठी नगरच्या पोलिसांनी
वरिष्ठांच्या आदेशावरून मोठी शोध मोहीम राबविली. गावागावात जाऊन पोलिसांनी
ग्रामस्थांना आरोपीचे वर्णन सांगून पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार
काही ठिकाणी तसा व्यक्ती दिसल्याचे फोन पोलिसांना येऊ लागले. बेडीसह फिरणारा माणूस
पाहिला, त्याला विहिरीवर ओंजळीने पाणी
पिताना पाहिले, अशा अनेक खबरा पोलिसांना मिळत होत्या.
प्रत्यक्षात तेथे जाऊन खातरजमा केल्यानंतर काहीही हाती लागत नव्हतं. पोलिसांनी
पारनेर आणि नगर तालुका पिंजून काढला, उभ्या पिकात घुसून
पोलीस शोध घेत होते. तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी ख्वाजाबद्दल माहिती देणाऱ्यास
बक्षीसही जाहीर केले होते. काही दिवसांनी त्याच्या बद्दल येणारी माहितीही बंद
झाली. ना तो जिवंत सापडला ना मृतदेह. त्यामुळे हे गूढ कायम राहिले.
ख्वाजाच्या
नातेवाईकांनी मात्र पोलिसांवरच आरोप केले. पोलीस कोठडीत त्याचा छळ झाल्याने मृत्यू
झाल्याचा आणि नंतर पोलिसांनी हा बनाव रचल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला
होता. त्यांच्या केंद्रस्थानीही सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकारी होते. त्यामुळे
पुढे वाझे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार ३ मार्च २००४ रोजी
निलंबित करण्यात आले होते. ख्वाजा युनूसच्या कुटुंबियांना ठराविक नुकसानभरपाईचा
आदेशही झाला होता. त्यानंतर १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ६ जून २०२० रोजी
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानुसार सचिन वाझे, राजेंद्र तिवारी,
सुनील देसाई आणि राजाराम निकम या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत
दाखल करुन घेण्यात आले.
ख्वाजा प्रकरण
मात्र अद्याप न्यायप्रविष्ट आहे. नगर जिल्ह्यातून तो गायब झाल्याचे सांगण्यात आले, तेव्हा पोलीस यंत्रणा सूत्रबद्ध
राबली होती. त्यावेळी नगर जिल्ह्यातील जातेगाव घाट आणि तेथील अपघाताची घटना
चांगलीच चर्चेत होती. त्यावेळी नगर-पुणे महामार्ग दुपदरी होता. घाटात रस्ता अरुंद
होता. आता हा महामार्ग चौपदरी झाला आहे. त्या भागासाठी नवे सुपे पोलीस ठाणेही झाले
आहे. अलीकडे याच घाटात रेखा जरे यांची हत्या झाली आहे. हे प्रकरण सध्या नगर
जिल्ह्यात गाजत आहे. त्यामुळे हा घाट पुन्हा चर्चेत आला. आता मुंबईत वाझे
यांच्याबददल चर्चा सुरू झाल्याने ख्वाजा प्रकरणाची आठवण होऊन याच जातेगाव घाटाची
चर्चा सुरू झालीय.
0 टिप्पण्या