लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नाशिक:- गारपिटीने
त्रस्त असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्याने संतप्त
शेतकऱ्यांनी सटाण्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना केरसाणे
ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त
असलेल्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित
केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी
आलेले आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केरसाणे ग्रामपंचायत
कार्यालयात कोंडले.
जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन
जोडले जात नाही तोपर्यंत आमदारांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी
कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला. महावितरणच्या आडमुठ्या धोरणाचा यावेळी ग्रामस्थांनी
निषेध केला. दरम्यान, वीज कनेक्शन जोडणी केल्यानंतर आमदार
बोरसे यांना कार्यालयाबाहेर सोडण्यात आले.
महावितरण विरोधात असंतोष
राज्यभरात विजबिलांचा प्रश्न सध्या कळीचा
बनला आहे. महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून वीजबिल वसुलीचा धडक कार्यक्रम
हाती घेण्यात आला आहे. ही बहुतांश थकबाकी लॉकडाऊन काळातील असून त्याला मोठ्या
प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान, थकबाकी न भरल्यास वीज जोडणी तोडली जात असल्याने असंतोष अधिकच वाढला आहे.
याच असंतोषाचा फटका आमदार बोरसे यांना आज बसला. आमदार बोरसे हे केरसाणे येथे
अवकाळी पावसाने पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी आले असता
त्यांना शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून आपला निषेध नोंदवला. नंतर
तासाभराने आमदार बोरसे यांची ग्रामपंचायत कार्यालयातून सुटका करण्यात आली.
0 टिप्पण्या