लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नाशिक : . नंदीशिवाय शिवमंदिर ही कल्पनाच कुणी केली नसेल. मंदिर छोटे असो वा मोठे, शिवपिंडीसमोर नंदी विराजमान असतोच. मात्र, एके ठिकाणच्या शिवमंदिरात नंदी विराजमान असल्याचे दिसत नाही. शंकरासमोर नंदी नसलेले हे एकमेव मंदिर असावे
भारतात केवळ महादेव शिवशंकरांचीच हजारो मंदिरे आहेत. कोट्यवधी भाविक दररोज शिवाची उपासना, नामस्मरण, आराधना करत असतात. शिवावर श्रद्धा असणारे भाविक केवळ भारतात नाही, तर परदेशातही आहेत. शिवस्थान मानल्या जाणाऱ्या कैलास पर्वत, अमरनाथ गुफा येथील अनेक रहस्ये आपल्याला केवळ अद्भूत करणारी अशीच आहेत. विज्ञानाकडेही या स्थळांच्या चमत्कारिकतेबाबत उत्तरे नाहीत. देशभरातील शिवमंदिरांमध्ये एक गोष्ट अगदी सामान्य असते. ती म्हणजे शिवमंदिरातील नंदी.
नंदी हे शिवाचे वाहन मानले जाते. नंदीशिवाय शिवमंदिर ही कल्पनाच कुणी केली नसेल. मंदिर छोटे असो वा मोठे असो, शिवपिंडीसमोर नंदी विराजमान असतोच. मात्र, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक शिवमंदिर आहे, ज्या शिवमंदिरात नंदी विराजमान असल्याचे दिसत नाही. ते म्हणजे नाशिक शहरात गोदावरी जिथे दक्षिणवाहिनी झाली, त्या रामकुंडासमोरच्या टेकडीवरचे श्री कपालेश्वर महादेव मंदिर. श्रीविष्णुंनी स्वतः शिवपिंडीची स्थापना केली असल्याने, कपालेश्वर दर्शनातून बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य लाभते असे मानले जाते. कपालेश्वर अर्थात साक्षात शंकरांनी इथे निवास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो. या मंदिरातही श्रावण महिन्यात भाविकांची मोठी रीघ लागलेली असते.
शंकरासमोर नंदी नसलेले हे एकमेव मंदिर असावे, अशी मान्यता आहे. नंदी नसल्याची आख्यायिका पुराणात आढळते. एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व महेश यात वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणाऱ्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत, तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते.
नंदी ठरला शंकराचा मार्गदर्शक
एकदा सोमेश्वर येथे बसले असता, समोरच एक गाय व तिचा गोऱ्हा (नंदी) एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोऱ्हा म्हणाला की, मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार. त्यावर त्या गायीने त्यास म्हटले की, तू हे केलेस तर तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल. त्यावर नंदी म्हणाला की, मला त्यावरचा उपाय माहीत आहे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नंदीला वेसण घालायला आला असताना, नंदीने त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे काय होतं हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागले. त्यानंतर त्या नंदीने गोदावरीच्या पात्रातील (रामकुंड) त्रिवेणी संगमावर (अरुणासंगम) येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ रंग त्याला परत मिळाला. ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले आणि हाताला चिकटलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली, अशी आख्यायिक सांगितली जाते.
शिवाने नंदीला मानले आपले गुरु
गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे तुला माझ्यापुढे बसण्याची गरज नाही, तू गुरुसमान आहेस, असे शंकराने नंदीस सांगितले. त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे. तो नंदी रामकुंडात (गोदावरीतच) विसावला आहे, असेही मानले जाते. त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार १२ ज्योर्तिलिंगानंतर 'कपालेश्वर' मंदिराचं महत्त्व आहे, असे सांगितले जाते.
0 टिप्पण्या