Ticker

6/Breaking/ticker-posts

पारनेरकरांच्या तक्रारीनंतर पुण्याची वीज तोडली..


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगर:- नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातच पुरेशी वीज उपलब्ध नसताना येथून पुणे जिल्ह्यातील  तालुक्याना  वीज जातेच कशी, असा सवाल करीत  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेरकर ग्रामस्थांनी वीज कंपनीत आंदोलन केले. त्यामुळे नगर जिल्ह्यातून पुण्याच्या ३४ गावांना होणारा वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. कुकडीचे पाणी देताना पुणेकर मंडळी नगरकरांची अडवणूक करतात, त्यामुळे आपल्याकडील वीज त्यांना का द्यायची, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर उपअभियंता प्रशांत आडभाई यांनी पुणे जिल्ह्यात जाणारी वीज बंद करण्यात येऊन पारनेर तालुक्यातील गावांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले.

तालुक्यातील अनेक गावांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नसल्याचे झावरे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. ज्या शेतकऱ्यांनी विजेची थकबाकी भरली त्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, अशीही मागणी करण्यात आली. पारनेर तालुक्यातील वीज पुणे जिल्ह्याला दिली जात असल्याच्या मुद्द्यावर शेतकरी आक्रमक झाले होते. पारनेर तालुक्याला कमी क्षमतेने वीज पुरवठा होतो त्यामुळे पुणे जिल्ह्याला वीज देताच कशी? असा सवाल करण्यात आला. यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

नगर जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातून पाणी येते. याचे नियोजन करताना आणि त्यानंतरही पुणेकरांची मर्जी चालते. नगरच्या वाट्याचे पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असे असताना नगर जिल्ह्यातील गावांसाठीची वीज पुणे जिल्ह्यात का म्हणून द्यायची, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. मात्र, आडभाई यांनी हा वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगितल्यावर सर्वांचा समाधान झाले. थकबाकी वसुली आणि त्यासाठी वीज कनेक्शन तोडले जात असल्याच्या मुद्द्यावरही शेतकरी आक्रमक झाले होते. मात्र, यासंबंधी सरकारकडून आलेल्या सूचनांचे पालन केले जाणार असल्याचे वीज अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारचे यासंबंधीचे धोरण दुटप्पी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या