Ticker

6/Breaking/ticker-posts

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक; डेटा परत देण्याच्या बदल्यात हॅकर्सनी केली ५०० कोटींची मागणी

 



( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


मुंबई :-एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करण्यात आला आहे. ही घटना मागील आठवड्यात घडली असून अद्याप प्रशासनाकडून त्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही, याकडे सायबर तज्ज्ञ अॅड. डॉ. प्रशांत माळी यांनी लक्ष वेधले आहे. एमआयडीसीसारख्या महत्त्वाच्या संस्थेचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे राज्याची सर्व औद्योगिक माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे. ही माहिती परत देण्यासाठी हॅकर्सनी ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

यासंदर्भात अॅड. डॉ. प्रशांत माळी यांनी 'मटा'ला सांगितले की, २२ मार्चपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाला आहे. परंतु शासकीय अनास्था एवढी आहे की, अद्याप साधी पोलिस तक्रारही केली गेलेली नाही. गेले आठवडाभर हॅकर एमआयडीसीच्या प्रत्येक फाइलमध्ये शिरून महत्त्वाची माहिती लांबवत असताना प्रशासनाला त्याची कल्पनाही नसावी, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. मुळात एमआयडीसीसारख्या महत्त्वाकांक्षी आणि करोनाकाळात बिकट अवस्थेतील अर्थव्यवस्थेला प्रगतिपथावर नेण्याची क्षमता असलेल्या संस्थेची संवेदनशील माहिती चोरीला जाणे हे धोकादायक आहे. हॅकरनी एमआयडीसीकडे सर्व माहिती परत देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैशांची ही मागणी पूर्ण न झाल्यास हॅक केलेली माहिती पुसून टाकण्याची (डिलिट करण्याची) किंवा लीक करण्याची धमकीही हॅकरनी दिली आहे. ३१ मार्च ही शेवटची तारीख असणाऱ्या एमआयडीसीच्या अनेक महत्त्वाच्या निविदा प्रक्रिया यामुळे रखडणार आहेत, याकडेही माळी यांनी लक्ष वेधले आहे.

माहिती निरुपयोगी
हॅकरनी एमआयडीसीची चोरलेली माहिती अर्थहीन (एनक्रिप्ट) केली आहे. ही माहिती पुन्हा मिळवण्यासाठी ती अर्थपूर्ण (डिक्रिप्ट) करणे आवश्यक आहे. बॅकअप सर्व्हरमधून अजून माहिती (डेटा) काढून सिस्टीम सुरू करता आलेली नाही, हे अधिकच धोकादायक आहे.


महत्त्वाची माहिती चोरीला
एमआयडीसीच्या १६ प्रादेशिक कार्यालयांचे कामकाज आठवडाभरापासून विस्कळित झाले आहे. हॅकरनी सर्व औद्योगिक वसाहतींची माहिती चोरली आहे. याखेरीज एमआयडीसीत कार्यरत उद्योजक, कंपन्या, सरकारी आस्थापने आणि एमआयडीसीशी संबंधित विविध योजना यांचीही माहिती हॅकरच्या हाती लागली आहे. हा खंडणी वसूल करणाऱ्या सॉफ्टवेअरचा अर्थात रॅनसमवेअरचा हल्ला आहे. एमआयडीसीमध्ये कोणताही संगणक सुरू केल्यानंतर व्हायरस दिसून येत आहे. तरीही सिस्टीम सुरू केल्यास माहिती गहाळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या