लोकनेता न्यूज
अहमदनगर :- गेल्या वर्षी जुलै
महिन्यात महापोर्टलवरून घेण्यात आलेल्या तलाठीपदाच्या परिक्षेमध्ये दोन
विद्यार्थ्यांच्या जागी डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार
उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात
फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी
तक्रार दिली आहे. त्यानुसार नेमीचंद विठ्ठलसिंग ब्रम्हनात (वय ३९, रा. औरंगाबाद) आणि रामेश्वर विठ्ठल
जरवाल (वय २७) आणि या दोघांच्या नावावर परीक्षा देणारे दोन अशा चौघांवर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील संकल्प बिजनेस स्कूल येथे १९ जुलै २०१९
रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर
जिल्ह्यात तलाठी पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. या पदासाठी
महापोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन परिक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेचे केंद्र
आंबेगाव बुद्रुक येथील संकल्प बिझनेस स्कूल हे होते. नेमीचंद ब्रम्हनात व रामेश्वर
जरवाल या दोघांचे तलाठी पदासाठी ऑनलाइन परिक्षेचे केंद्र हे या ठिकाणीच होते. या
दोघांनी परीक्षेसाठी अर्ज केला असताना त्यांच्या नावाने दुसऱ्याच विद्यार्थ्यांनी
ही परीक्षा दिली. नगर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत चौकशी झाली. त्यावेळी हा
प्रकार लक्षात आला. त्यानंतर तत्काळ नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार
देण्यात आली. कोतवाली पोलिसांनी शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो भारती
विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास
करत आहेत.
0 टिप्पण्या