Ticker

6/Breaking/ticker-posts

परमबीर यांचे पत्र धक्कादायक !; राज यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून भाजपपाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानीही गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे. 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांचे प्रकरण रोज नवी वळणे घेत आहे. याप्रकरणात सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने थेट पोलीस दलातच मोठे फेरबदल केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली व राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे या पदाची धुरा देण्यात आली. सरकारने हा दणका दिल्यानंतर परमबीर सिंग हे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्या नाराजीतूनच शनिवारी त्यांनी लेटरबॉम्ब टाकला.

 परमबीर यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांना देशमुख यांनी महिना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा सिंग यांनी या पत्रात केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हे सर्व आरोप देशमुख यांनी फेटाळले व परमबीर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असे सांगितले. विरोधी पक्षाचे मात्र यावर समाधान झालेले नसून गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जाऊ लागली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फड्णवीस तसेच भाजपच्या राज्यातल्या आणि दिल्लीतल्या नेत्यांनी अनिल देशमुख यांच्यावर तसेच सरकारवर तोफ डागत देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यापाठोपाठ मनसेनेही तशीच मागणी केली आहे. ' मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरिय चौकशी देखील व्हायला हवी', असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या