Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनामुळे होळी व धूलिवंदनास मनाई

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पुणे: राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. येत्या काळात करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे नमूद करत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात होळी व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरासाठीही पालिका आयुक्तांनी अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत.

 कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे २८ मार्च रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच २९ मार्च रोजी साजरा होणारा धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यावर तात्काळ नियंत्रण आणणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याची बाब अधोरेखित करत जिल्हा प्रशासनाने कठोर पावले टाकली आहेत. जिल्हयातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले असून आपल्या अधिकारातच जिल्हाधिकाऱ्यांनी होळीबाबत आदेश काढला आहे. कोविड-१९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेता, मानद कार्यप्रणालीनुसार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धूलिवंदन सण एकत्रित येऊन साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या