२२६ वर्षापूर्वी खर्ड्याच्या लढाईचा विजयोत्सव श्रीगोंद्यात साजरा केला होता-प्रा.तुकाराम दरेकर
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
श्रीगोंदा :- २२६ वर्षापूर्वी म्हणजे शुक्रवार दि.१३ मार्च १७९५ रोजी खर्ड्याच्या लढाईचा विजयोत्सव श्रीगोंदा येथील पूर्व बाजूच्या पहिल्या चौकात भगवा झेंडा फडकावून साजरा केला होता.म्हणून या चौकाला 'विजय चौक झेंडा' हे नाव पडलेले आहे, अशी माहिती इतिहासाचे प्राध्यापक प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिली.
२२६ वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक घटनेची स्मृती आज( १३ मार्च २०२१) जागृत करताना प्रा. दरेकर म्हणाले, सन १७६१ च्या पानिपत युद्धानंतर महादजी शिंदे यांनी उत्तरेत मराठ्यांचा दरारा निर्माण करून मोगल बादशहाला सहकार्य केले. म्हणून बादशाहने दक्षिणेकडील आपला सरदार हैदराबादचा निजाम उल मुल्क याला फर्मान काढले की महादजी शिंदे यांना ५ कोटी रुपये व आपला एक तृतीयांश मुलुख द्यावा.निजामाने मात्र नकार दिला.
दरम्यान १२ फेब्रुवारी १७९४ रोजी पुण्याच्या वानवडी येथे महादजी शिंदे यांचे निधन झाले. त्यांचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांनी नाना फडणवीस, तुकोजी होळकर, रघुजी भोसले अशा ८४ सरदारांना बरोबर घेऊन खर्ड्याच्या किल्ल्याचा आश्रय घेऊन बसलेल्या निजाम उल मुल्क याच्यावर ११ मार्च १७९५ रोजी चाल केली. त्या दिवशी दहा तास चाललेल्या युद्धात मराठ्यांनी निजामाचा पराभव करून झालेल्या तहात पाच कोटी रुपये व एक तृतीयांश मुलुख मिळविला. पुण्याला परत जाताना तो विजय श्रीगोंदा तथा 'चांभारगोंदा' येथे १३ मार्च १७९५ रोजी साजरा केला, असेही प्रा. दरेकर म्हणाले.
0 टिप्पण्या