Ticker

6/Breaking/ticker-posts

''मी जबाबदार! कि बेजबाबदार ? '' करोना रुग्णांसोबत आमदाराचा विनामास्क सेल्फी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर: ‘मी जबाबदार! माझा मास्क माझी सुरक्षा,’ असे सांगत खुद्द मुख्यमंत्री आणि राज्य सरकार नागरिकांना मास्क वापरासंबधी प्रबोधन करीत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना प्रशासनाकडून दंड केला जात आहे. असे असूनही पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी मात्र रुग्णालयात उपचार सुर असलेल्या रुग्णांची कोणत्याही सुरक्षेविना भेट घेतली. त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे" असे सांगत लंके यांनी ही भेट घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात घातल्याचे दिसून येते.

पारनेर तालुक्यातील सुपे येथील एका खासगी 
कोरोना रुग्णालयास आमदार लंके यांनी भेट दिली. गेल्या वेळीही करोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी लंके यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले होते. सर्वांत मोठे कोविड सेंटरही त्यांनी सुरू केले. रुग्णांना दिलासा दिला. आता पुन्हा त्यांनी हेच काम सुरू केले आहे, या गोष्टी खऱ्या असल्या तरी रुग्णांप्रती काळजी असल्याचे दाखविताना त्यांनी आपल्याच सरकारने घालून दिलेल्या नियमांचा मात्र भंग केल्याचे दिसते.

अलीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लंके यांच्या पारनेर तालुक्यातही ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लंके यांनी सुपे येथील खासगी रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी तेथील डॉ. बाळासाहेब पठारे हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. करोनाची लक्षणे असलेल्या तसेच श्‍वसनाचा अधिक त्रास होत असलेल्या रुग्णांची लंके यांनी थेट त्यांच्या खाटांजवळ जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. काही ठिकाणी रुग्णांनी त्यांचे सेल्फी घेतले तर काही ठिकाणी स्वत: लंके यांनीही रुग्णांसोबत सेल्फी घेतले. लंके यांच्या या भेटीमुळे उपचार घेत असलेले रुग्ण सुखावल्याचे सांगण्यात आले. करोना बाधितांच्या जवळ जाण्यास त्यांच्या नातेवाईकांनाही मनाई आहे.

अशा परिस्थितीत आमदारांनी थेट जवळ जाऊन भेट घेतली. तेही पीपीई कीट आणि साधा मास्कही न लावता. लंके यांच्या या धाडसाचेत्यांच्या समर्थकांकडूनही कौतुक होत आहे. मात्र, आरोग्य आणि सरकारी नियमांच्या विरोधात त्यांची ही कृती असल्याचे दिसून येते. भेट घेऊन दिलासा द्यायचा असेल तर सुरक्षेसंबंधी योग्य ती काळजी घेऊन जाता आले असते, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना, अन्य नियम मोडणाऱ्यांना दंड केला जात आहे, अशा परिस्थितीत बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधीसंबंधी प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या