Ticker

6/Breaking/ticker-posts

'मी मंत्री असताना असं झालं असतं तर थेट राजीनामा दिला असता'

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

अहमदनगर:  ‘थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे अन्यायकारक आहे. आपण जर मंत्री असतो तर हा अन्याय सहन केला नसता. यावर काहीच करू शकलो नसतो तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा तरी नक्कीच दिला असता,’ अशा शब्दांत नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक तनपुरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.


राहुरी तालुक्यात एका कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते. उर्जा राज्यमंत्री तनपुरे राहुरी तालुक्यातील असून स्थानिक राजकारणात ते विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे विरोधक आहेत. कर्डिले यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा डॉ. विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी विखे बोलत होते. सध्या वीज बिल वसुलीचा आणि त्यासाठी वीज तोडण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.  हाच धागा पकडून विखे यांनी राज्यमंत्री तनपुरे यांच्यावर निशाणा साधला.


विखे म्हणाले, ‘राहुरी तालुक्यातील जनतेच्या आशीवार्दाने येथील आमदाराला मंत्रिपद मिळाले.  मात्र, मंत्रिपद असून जर हे लोकप्रतिनिधी आपल्याच मदतदारसंघातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवू शकत नसतील तर त्याचा काय उपयोग? अशांना मंत्रिपदावर राहण्याचा आणि तालुक्यात यायचाही अधिकार नाही. आमचे सरकार असते तर माझे वडील आणि कर्डिले हेही मंत्री असते. तेव्हा आम्ही अशी वेळच येऊ दिली नसती.

एकाही शेतकऱ्याच्या डीपीला हात लावू दिला नसता. बाकीच्या राज्याचे सोडा, पण किमान आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना तरी नक्कीच संरक्षण दिले असते. त्यावेळी जर अधिकाऱ्यांनी ऐकले नसते, तर शेतकऱ्यांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता. आम्ही लॉटरी लागून मंत्री किंवा आमदार कधीच झालेलो नाही. आमच्या रक्तात संर्घष आहे. आम्ही संघर्ष करून पदे मिळवितो. कोणी आमच्यावर उपकार केलेले नाहीत. सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेने आम्हाला डोक्यावर घेतल्याने आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आम्ही त्या जनतेसाठी आहोत, ही भावना आमच्यामध्ये आहे,’   असेही ते    म्हणाले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या